
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्यापासून शुबमन गिलच्या खांद्यावर वनडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्याच्या नेतृत्वात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दिग्गज खेळाडू खेळत आहे. पण या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाची धूळ चाखावी लागली. त्यामुळे मालिका गमावली होती आणि व्हाईटवॉशची भिती तिसऱ्या सामन्यात होती. पण भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिलने सलग तिसऱ्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने सामन्याची सुरुवात दमदार केली. त्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली होती. पण या सामन्यात माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं मार्गदर्शन शुबमन गिलला लाभलं.
रोहित शर्मा या मालिकेत फिल्ड प्लेसमेंटवर गोलंदाजांशी चर्चा करताना दिसला होता. त्यानंतर सिडनी वनडे सामन्यात डावाच्या मध्यात कर्णधार शुबमन गिलला थांबवून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलशी चर्चा केली. यावेळी विराट कोहली त्यांना मार्गदर्शन करत होता. शुबमन गिल दुसरीकडे जात होता. तेव्हा विराट कोहलीने त्याच्या हाताला पकडून केएल राहुलकडे आणले आणि चर्चा केली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The only leadership summit all of us want to be part of! 📝📚#AUSvIND 👉 3rd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/0evPIuANAu pic.twitter.com/HzAE2KIPI1
— Star Sports (@StarSportsIndia) October 25, 2025
“विराट कोहली इथे शुबमन गिल, केएल राहुल यांच्याशी बोलताना दिसत आहे. शेवटच्या काही षटकांपासून मला त्याचा सहभाग दिसत आहे. त्याच्याकडे अनुभव आहे. कर्णधार का दर्जा कदाचित नाही पण अनुभव आहे. रोहित शर्मा, विराट कोहली किंवा केएल राहुल असोत. ते त्यांचे सर्व ज्ञान शेअर करू शकतात, जरी शेवटी ते गिलवर अवलंबून आहे की तो ते अंमलात आणू इच्छितो की नाही.”, असं समालोचक सामना सुरु असताना म्हणत होते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी नाबाद 168 धावांची भागीदारी केली. यात रोहित शर्माने नाबाद 121 धावा, तर विराट कोहलीने नाबाद 74 धावांचं योगदान दिलं. या विजयासह भारताने मालिकेतील व्हाईटवॉश वाचवला.