विराटने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला, सामन्यानंतर रनचेजबाबत स्पष्ट म्हणाला की….
भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे मालिकेत 9 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात भारताने 237 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. रोहित शर्माची शतकी आणि विराट कोहलीची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. या सामन्यात विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला.

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही हे पहिल्या दोन वनडे सामन्यात दिसून आलं होतं. पण तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. भारताने 237 धावांचा पाठलाग यशस्वीरित्या केला. रोहित शर्माने शतक आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत हा सामना जिंकून दिला. त्यांच्या नाबाद 168 भागीदारीमुळे भारताने 9 गडी राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने मालिका 2-1 ने गमावली पण तिसऱ्या वनडे सामन्यात विराट कोहलीने विक्रम रचले. त्यात विराट कोहलीने विजयी धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. विराट कोहली पहिल्या दोन वनडे सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मात्र तिसऱ्या वनडे सामन्यात त्याने 81 चेंडूत 7 चौकार मारत नाबाद 74 धावांची खेळी केली. तसेच सचिन तेंडुलकरचा धावांचा पाठलाग करताना केलेल्या 50हून अधिक धावांचा विक्रम मोडला.
विराट कोहलीने मोडला सचिनचा विक्रम
वनडे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकरने 69 वेळा 50हून अधिक धावांचा पाठलाग केला. तर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या खेळीनंतर वनडे क्रिकेटमध्ये 70व्यांदा 50हून अधिक धावा केल्या आहेत. इतकंच काय तर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या मागच्या 10 डावातील अपयशही पुसून काढलं आहे. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या मागच्या 10 डावात फक्त 90 धावा केल्या होत्या. या 10 डावात एकही अर्धशतक नव्हतं. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियातील सिडनीत पहिलं वनडे अर्धशतक ठोकलं.
विराट कोहलीने या सामन्यानंतर सांगितलं की, ‘पुढच्या काही दिवसांत जवळजवळ 37 वर्षांचा होणार आहे. पण पाठलाग करताना नेहमीच माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी होते. रोहितसोबत मोठी सामना जिंकणारी भागीदारी असणे छान आहे. मला वाटते की सुरुवातीपासूनच, आम्हाला परिस्थिती चांगली समजली आहे. आम्ही नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. आम्ही कदाचित आता सर्वात अनुभवी जोडी आहोत, परंतु जेव्हा आम्ही तरुण होतो तेव्हा आम्हाला माहित होते की आम्ही मोठ्या भागीदारी करून त्यांच्याकडून खेळ हिरावून घेऊ शकतो. मला वाटते की हे सर्व 2013 मध्ये सुरू झाले.’
