विराट-अनुष्का तुला विचारतही नाही..; म्हणणाऱ्याला बहीण भावना कोहलीचं सडेतोड उत्तर
भाऊ विराट कोहली आणि वहिनी अनुष्का शर्मा कधी तुझा उल्लेखही करत नाही, तुझी पोस्ट लाइक करत नाही.. अशा शब्दांत एका नेटकऱ्याने भावना कोहलील ट्रोल केलं. त्यावर तिनेही त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलचं अठरावं सिझन जिंकून इतिहास रचला. हा विजय केवळ आरसीबीसाठीच नाही तर विराट कोहलीसाठीही खूप खास होता. कारण तो गेल्या 18 वर्षांपासून या विजयाची प्रतीक्षा करत होता. दीर्घ प्रतीक्षेनंतर त्याला आयपीएलच्या जेतेपदाची चव चाखायला मिळाली. या विजयानंतर विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी कशाप्रकारे आनंद साजरा केला, भावना व्यक्त केल्या.. हे सर्व सतत माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर पहायला मिळालं. परंतु यादरम्यान विराटची बहीण भावना कोहली एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. भावनानेही सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित भावाचं अभिनंदन केलं होतं. परंतु तिची ही पोस्ट काहींना आवडली नाही आणि त्यांनी त्यावरून भावनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. काहींनी भाऊ विराट आणि वहिनी अनुष्कासोबतच्या तिच्या नात्यावरही प्रश्न उपस्थित केले. या ट्रोलिंगला अखेर भावनाने सडेतोड उत्तर दिलं आहे.
आरसीबीच्या विजयानंतर भावनाने लिहिलं, ‘आज रात्री जेव्हा आपण त्या स्वप्नाचा उत्सव साजरा करतोय, ज्याने आपल्याला रडवलं आणि हसवलं. तुम्ही केलेली प्रतीक्षा खूप दीर्घ होती. त्या क्षणाचा प्रत्येक सेकंद शांततेनं अनुभवला पाहिजे. अखेर ती प्रतीक्षा प्रत्यक्षात संपली आहे. संकटकाळात आरसीबीच्या पाठिशी उभे असलेल्या लाखो चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील. जे तुमच्यावर प्रेम करतात, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात तुमचे अश्रू जाणवले. आम्ही तुमच्यासोबत रडलो. कारण माझा लहान भाऊ वीरू.. तू देवाने निवडलेला खास आहेत. प्रत्येकासाठी तू खूप आनंद आणि प्रेरणा घेऊन येतो. स्वर्गातील एका व्यक्तीलाही त्यांच्या मुलाला पाहून खूप अभिमान वाटत असेल.’
View this post on Instagram

भावनाच्या याच पोस्टवर एका युजरने कमेंट करत एका युजरने विराटशी असलेल्या तिच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केला. ‘विराट त्याच्या भाषणात कधीच तुझा उल्लेख करत नाही, तो कधीच तुझी पोस्ट लाइक करत नाही. अनुष्काही तुझ्याबद्दल काही म्हणत नाही’, असं त्याने लिहिलं. त्यावर भावनाने सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘प्रेम हे अनेक मार्गाने अस्तित्त्वात असतं हे समजण्यासाठीचा संयम देव तुला देवो. ते प्रेम जगाला दाखवणं गरजेचंच असतं असं नाही, पण तरीसुद्धा त्या नात्यात प्रेम असतं. जसं आपण त्या देवावर प्रेम करतो. तुला तुझ्या आयुष्यात पुरेसं प्रेम मिळू दे अशी अपेक्षा करते. त्यात कुठलीही असुरक्षितता नसू दे. फक्त खरे बंध असू देत, ज्यांना कोणत्याही पुराव्यांची गरज नसते. देव तुझं भलं करो’, अशी प्रतिक्रिया भावनाने दिली आहे. भावनाची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
