IND vs PAK : गोलंदाज की फलंदाज! दुबईच्या खेळपट्टीवर कोण ठरणार भारी? जाणून घ्या खेळपट्टीची माहिती
चॅम्पियन्स ट्रॉफीतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची चर्चा रंगली आहे. पण खेळपट्टी कोणाला साथ देणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊयात दुबईतील खेळपट्टी कोणाला साथ देणार ते..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होत आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. भारताने या खेळपट्टीवर बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळला आणि जिंकलाही. पण आात पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात खेळपट्टी कशी असेल आणि कोणत्या प्लेइंग 11 सह टीम इंडिया मैदानात उतरणार हा प्रश्न आहे. पाकिस्तान संघावर भारतापेक्षा जास्त दडपण असणार आहे. कारण हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरोची लढाई असणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर थेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. भारताने पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकला तर थेट उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही देशांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे. दुबईची खेळपट्टी ही संथ असून गोलंदाजांना मदत करणारी आहे. चेंडू जुना झाला की फलंदाजांना या खेळपट्टीवर गोलंदाजांचा सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही.
भारत बांग्लादेश सामन्यात पहिल्या 10 षटकात धावा करणं फलंदाजांना कठीण गेलं होतं. या मैदानावर आतापर्यंत 59 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात 22 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तर 35 वेळा धावांचा पाठलाग करताना संघाने विजय मिळवला आहे. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना 215 ते 220 असा स्कोअर होतो. तर 300 हून अधिक धावा करणं या खेळपट्टीवर वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, टीम इंडिया 11 सामन्यात सलग नाणेफेकीचा कौल गमवत आली आहे. आता 12 व्या सामन्यात काय होतं? याकडे लक्ष आहे.
भारत पाकिस्तान सामन्यात हवामान कसं असेल? याकडेही क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. अॅक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, या दिवशी कमाल तापमान हे 31 डिग्री सेल्सिअस असेल. तर किमान तापमान हे 23 डिग्री सेल्सिअस असेल. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल आणि पावसाची शक्यता अजिबात नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमी या सामन्यांचा पूर्ण आनंद लुटू शकतात.
