WTC 2027 Point Table : दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर काय? पाकिस्तान-अफ्रिकेला नंबर 1 होण्याची संधी

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. दुसरीकडे, पाकिस्तान दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी सामना होत आहे. या सामन्याचाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर परिणाम होणार आहे.

WTC 2027 Point Table : दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर काय? पाकिस्तान-अफ्रिकेला नंबर 1 होण्याची संधी
WTC 2027 Point Table : दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर काय? पाकिस्तान-अफ्रिकेला नंबर 1 होण्याची संधी
Image Credit source: BCCI Twitter
Updated on: Oct 13, 2025 | 5:36 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धा आता प्रत्येक मालिकेनंतर पुढे सरकत आहे. यंदाचं चौथं पर्व असून अंतिम फेरी गाठण्यासाठी संघांची धडपड सुरु झाली आहे. तिसऱ्या पर्वात टीम इंडियाचं स्वप्न थोडक्यासाठी हुकलं होतं. न्यूझीलंकडकडून 3-0 ने मात मिळाल्यानंतर टीम इंडियाचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे आता टीम इंडिया ताकही फुंकून पित आहे. चौथ्या पर्वात इंग्लंडनंतर भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. आता दुसरा सामना जिंकण्याची संधी भारताकडे आहे. कारण 9 विकेट हातात असून पाचव्या दिवशी फक्त 58 धावांचं आव्हान गाठायचं आहे. वेस्ट इंडिजने विजयासाठी 121 धावांचं आव्हान दिलं असून चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारताने 1 गडी गमवून 63 धावा केल्या आहेत. केएल राहुल नाबाद 25 आणि साई सुदर्शन नाबाद 30 धावांवर खेळत आहे. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काय परिणाम होईल ते जाणून घ्या.

भारताने आतापर्यंत 6 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. एक सामना ड्रॉ, तर दोन सामन्यात पराभव झाला आहे. सध्या भारताची विजयी टक्केवारी 55.56 आहे. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारीत वाढ होईल. भारताची विजयी टक्केवारी 61.90 होईल. पण तिसऱ्या स्थानावरच समाधान मानावं लागेल. कारण श्रीलंकेची विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के असून दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया 100 टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत हा सामना जिंकणार हे 100 टक्के निश्चित आहे. पण एखादा चमत्कार घडला आणि भारताने हा सामना गमावला तर विजयी टक्केवारी 47.62 वर घसरेल.

दुसरीकडे, पाकिस्तान दक्षिण अफ्रिका सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होणार आहे, हे नक्की. दोन्ही संघ या पर्वातील पहिलाच सामना खेळत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्याचा गुणतालिकेवर थेट परिणाम होईल. पाकिस्तानने हा सामना जिंकला तर थेट संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर झेप घेईल. कारण एका विजयासह विजयी टक्केवारी 100 टक्के होईल. ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारीही 100 टक्के आहे. दुसरीकडे भारताची घसरण चौथ्या स्थानावर होईल. असंच दक्षिण अफ्रिकेच्या बाबतीत असेल. त्यांनी हा कसोटी सामना जिंकला तर पहिल्या स्थानावर झेप घेईल.

वेस्ट इंडिज पाकिस्तान सामना ड्रॉ झाला तर भारतीय संघ तिसऱ्याच स्थानी राहील. तर दक्षिण अफ्रिका आणि पाकिस्तान 33.33 विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या पाचव्या स्थानी राहतील. इंग्लंड 43.33 विजयी टक्केवारीसह चौथ्या स्थानी आहे. बांगलादेशचा संघ 16.67 विजयी टक्केवारीसह सातव्या स्थानी राहील. तर वेस्ट इंडिज पाचही सामन्यात पराभवासह 0 विजयी टक्केवारीसह शेवटी असेल. तर न्यूझीलंडचा एकही कसोटी सामना झालेला नाही.