युवराज सिंह होणार हेड कोच! आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी मोठ्या घडामोडी
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंह सध्या आयपीएल स्पर्धेपासून लांबच आहे. कोणत्याच संघाचं कोचिंग आणि मेंटॉरशिप नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्येही तसा काही सहभाग नाही. युवराज सिंगने शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला वैयक्तिक रुपाने ट्रेनिंग दिली. पण आता नव्या भूमिकेसाठी सज्ज असल्याची चर्चा आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी बऱ्याच घडामोडी घडत आहेत. काही खेळाडूंची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. काही संघांचे कर्णधार बदलले जाणार आहेत. तर काही खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे. मिनी लिलावापूर्वी काही फ्रेंचायझी कोचिंग आणि सपोर्ट स्टाफमध्ये बदल करत आहेत. आता एका संघात टीम इंडियाचा अष्टपैलू युवराज सिंहची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. आयपीएल स्पर्धेत युवराज सिंग लखनौ सुपर जायंट्सचा हेड कोच होण्याची शक्यता आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, फ्रेंचायझी सध्या युवराज सिंगसोबत कोचिंगसाठी चर्चा करत आहे. पण ही चर्चा प्राथमिक स्तरावर सुरु आहे. फ्रेंचायझी सध्या प्रशिक्षक जस्टिन लँगरला बदलण्याच्या तयारीत आहे. कारण स्थानिक खेळाडूंसोबत तालमेल बसवणं त्यांना कठीण जात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना स्फुरण देईल असा प्रशिक्षक लखनौ सुपर जायंट्सला हवा आहे.
रिपोर्टनुसार, लखनौ सुपर जायंट्स फ्रेंचायझी आता भारतीय खेळाडूकडे संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा देण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच युवराज सिंगसोबत चर्चा केली जात आहे. दुसरीकडे, युवराज सिंगने खेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाव कमावलं आहे. पण त्याच्याकडे कोणत्याही संघाचा कोचिंग किंवा मेंटॉरशिपचा अनुभव नाही. इतकंच काय तर सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिकाही बजावलेली नाही. पण युवराज सिंग वैयक्तिक स्तरावर खेळाडूंना कोचिंग देत आहे. यात भारतीय संघाचा प्रशिक्षक शुबमन गिल आणि सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. या दोघांना युवराज सिंगने चांगलं मार्गदर्शन दिलं आहे.
लखनौ सुपर जायंट्सची निराशाजनक कामगिरी
मागच्या दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरीचं दर्शन घडलं आहे. सध्याची कामगिरी पाहता जेतेपद जिंकण्याची उणीव असल्याचं दिसून आलं आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने आयपीएलमध्ये भाग घेतल्यानंतर आतापर्यंत झालेल्या चार पर्वात दोन वेळा हेड कोच बदलला आहे. सुरुवातीच्या दोन पर्वात अँडी फ्लॉवरच्या खांद्यावर प्रशिक्षकाची जबाबदारी होती. त्यानंतर जस्टीन लँगरकडे धुरा सोपवली. नव्या पर्वापूर्वी मेंटॉर झहीर खानला हटवलं आहे. आता प्रशिक्षक म्हणून युवराज सिंगची निवड केल्यास नव्या पर्वापूर्वी दुसरा मोठा बदल असेल.
