ZIM vs SL : दिलशान मधुशंकाने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत मॅच फिरवली, झिंबाब्वेवर 7 धावांनी मात, श्रीलंकेची विजयी सुरुवात
Dilshan Madushanka Hat Trick : दिलशान मधुशंका याने शेवटच्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत झिंबाब्वेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला आणि श्रीलंकेला जिंकवलं. श्रीलंकेने यासह विजयी सलामी दिली.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका याने झिंबाब्वे विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये हॅटट्रिक घेत सामना फिरवला. श्रीलंकेने झिंबाब्वेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. झिंबाब्वेने शानदार पद्धतीने धावांचा पाठलाग केला. त्यामुळे सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत पोहचला. झिंबाब्वेच्या हातात 5 विकेट्स होत्या. तसेच झिंबाब्वेला शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. त्यामुळे कोण जिंकणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून होती. मात्र दिलशानने हॅटट्रिक घेत 10 धावांचा यशस्वी बचाव केला आणि श्रीलंकेला जिंकवलं. श्रीलंकेने झिंबाब्वेवर 7 धावांनी मात केली आणि 2 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. श्रीलंकेने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली आहे.
मधुशंका याने 50 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 बॉलवर 3 विकेट्स घेत हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना फिरवला. मधुशंका याने ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नगारावा या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मधुशंकाने शेवटच्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या.
..आणि सामना फिरला
सिकंदर रझा 92 धावावंर खेळत होता. तर रझासोबत टोनी मुनियोंगा 42 धावांसह मैदानात होता. रझा-टोनी सेट जोडी मैदानात होती. त्यामुळे झिंबाब्वे जिंकेल, असं वाटत होतं. श्रीलंकेने मधुशंकाला शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी दिली. मधुशंकाने कर्णधार चरिथ असलंका याचा विश्वास खरा ठरवला.
मधुशंकाने पहिल्या बॉलवर सिंकदर रझा याला बोल्ड करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मधुशंकाने दुसऱ्या बॉलवर इव्हान्सला असिता फर्नांडो याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर मधुशंकाने रिचर्ड नगारावा याला बोल्ड करत हॅटट्रिक पूर्ण केली. त्यामुळे झिंबाब्वेला पुढील 3 बॉलमध्ये 10 धावा हव्या होत्या. मात्र मधुशकांने 3 बॉलमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या. मधुशंकाने एकूण 4 विकेट्स घेतल्या. मधुशंकाला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारने गौरवण्यात आलं.
सिंकदर रझाची खेळी व्यर्थ
झिंबाब्वेचा अटीतटीच्या सामन्यात निर्णायक क्षणी अखेरच्या ओव्हरमध्ये पराभव झाला. मात्र सिंकदर रझा याने त्याच्या खेळीने मनं जिंकली. झिंबाब्वेचा अर्धा संघ 161 धावांवर तंबूत परतला होता. मात्र त्यानंतर सिंकदरने टोनीसह शतकी भागीदारी केली. त्यामुळे झिंबाब्वेच्या विजयाचा आशा वाढल्या होत्या. मात्र सिंकदर शेवटच्या ओव्हरमध्ये झाला. सिंकदरची विकेट झिंबाब्वेच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट ठरला.
दरम्यान त्याआधी श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 298 धावा केल्या. श्रीलंकेसाठी पाथुम निसंका याने 76, लियानागे याने 70 तर कामिंदु मेंडीस याने 57 धावांची खेळी केली.
