PUBG चा नाद सोडवण्यासाठी बापाने पोराला शूटर बनवलं, आज ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं

PUBG चा नाद सोडवण्यासाठी बापाने पोराला शूटर बनवलं, आज ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं

बिजींग (चीन) : राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या दिव्यांश पनवारने आयएसएसएफ वर्ल्ड कपच्या ( Rifle and Pistol World Cup, Beijing 2019) 10 मीटर रायफल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. यासोबतच त्याला या स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीटही मिळाले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांशला पब्जी गेमचे व्यसन लागले होते. यामधून सुटका होण्यासाठी दिव्यांशच्या वडिलांनी त्याला शूटिंग रेंज क्लासमध्ये टाकले होते.

दिव्यांश सतत पब्जी गेम खेळत असल्याने त्याचे वडील त्याच्यावर रागवत होते. ही सवय मोडावी म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला दिल्ली येथील शूटिंग रेंज क्लासमध्ये टाकले. यानंतर दिव्यांश इतकी शानदार कामगिरी करेल अशी अपेक्षाही त्याच्या घरच्यांना नव्हती. दिव्यांशच्या या कामगिरीमुळे घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.

पब्जी ते आयएसएसएफ वर्ल्डकप प्रवास

दिव्यांशचे वडील अशोक पनवार मुलाच्या पब्जी गेमच्या सवयीने चिंतेत होते. यावेळी दिव्यांशच्या वडिलांनी 2017 मध्ये दीपक कुमार दुबे यांच्या देखरेखीखाली दिव्यांशला दिल्ली येथील शूटिंग रेंज क्लासमध्ये पाठवले. तिथे दिव्यांशची शूटिंग रेंजमधील आवड वाढली. यामध्ये अनेक छोट्या मोठ्या स्पर्धेत दिव्यांशने शानदार कामगिरी केली होती आणि यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळण्याची संधी मिळाली. दिव्यांशचे वडील नेहमी मुलाच्या पब्जी गेम खेळण्याच्या विरोधात होते. मात्र मुलाने पदक जिंकल्यावर पब्जी गेमवरील त्यांचा विरोध मावळलेला आहे.

“आम्ही दिव्यांशला ऑनलाईन गेम खेळतो म्हणून रागवायचो. इतर तरुणांप्रमाणे तो पण पब्जी गेम खेळायचा, यामुळेची मी सतत त्याच्यावर रागवायचो. त्याचा बिजींगमधील फायनल सामना आम्ही ऑनलाईन पाहिला. यामध्ये त्याने पदक जिंकले, त्यामुळे असं वाटत की, त्याने पब्जीमधील एक शानदार राऊंड खेळला”, असं दिव्यांशचे वडील अशोक पनवार म्हणाले.

बिजींग वर्ल्डकपमधील रौप्य पदक जिंकण्याआधीही दिव्यांशने अनेकदा शानदार कामगिरी केली आहे. दिव्यांशने 2017 मध्ये कुवेतमध्ये आयोजित शूटिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते आणि आता चीनमधील तायोवान वर्ल्डकपमध्ये पदक जिंकल्यावर दिव्यांशला 2020 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI