इंग्लंडचं गणित बिघडलं, सेमीफायनलमध्ये पुन्हा भारत-पाक लढतीची शक्यता

गुणतालिकेत इंग्लंड 8 गुणांसह सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने या मालिकेत ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ते पाहून इंग्लंडची ही अवस्था होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती.

इंग्लंडचं गणित बिघडलं, सेमीफायनलमध्ये पुन्हा भारत-पाक लढतीची शक्यता

लंडन : आयसीसी क्रिकेट विश्वचषकात सेमीफायनलचे सर्वांचे अंदाज चुकीचे ठरण्याची शक्यता आहे. कारण, ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पाकिस्तानच्याही सेमीफायनलच्या अपेक्षा जीवंत आहेत. पाकिस्तानकडेही आता सेनीफायनलमध्ये जाण्याची संधी आहे. पाकिस्तानने सेमीफायनलचे दरवाजे उघडल्यास पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान ही रंगतदार लढत होऊ शकते.

गुणतालिकेत इंग्लंड 8 गुणांसह सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडने या मालिकेत ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ते पाहून इंग्लंडची ही अवस्था होईल याची कुणी कल्पनाही केली नव्हती. पण श्रीलंका आणि नंतर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे इंग्लंडवर सेमीफायनलमध्ये जाण्यासाठीही संघर्षाची वेळ आली आहे. सेमीफायनलसाठी इंग्लंडला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. विशेष म्हणजे पुढील दोन्ही सामने भारत आणि न्यूझीलंड या बलाढ्य संघांसोबत आहेत. न्यूझीलंड आणि भारताने या विश्वचषकात अजून एकही सामना गमावलेला नाही.

इंग्लंडने भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचाही सामना गमावल्यास यजमान संघासाठीच अडचण निर्माण होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयामुळे पाकिस्तानचं काम सोपं झालं आहे, तर इंग्लंडचा मार्ग खडतर झालाय. इंग्लंडने उर्वरित दोन्ही सामने गमावल्यानंतर त्यांच्याकडे केवळ 8 गुण असतील. तर पाकिस्तानचे पुढील तीन सामने न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसोबत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा मार्ग सोपा मानला जातोय. पाकिस्तानने या तीनपैकी केवळ दोन सामने जिंकले तरीही त्यांचे 9 गुण होतील. पाकिस्तान सध्या 6 सामन्यात 5 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

या विश्वचषकात अद्याप एकही सामना न गमावलेला भारतीय संघ गुणतालिकेत 5 सामन्यात 9 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 जूनला लढत होईल. भारताचे उर्वरित सामने वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंकेसोबत होणार आहेत. हे सर्व सामने जिंकून भारताकडे अव्वल येण्याची संधी आहे.

सेमीफायनलमध्ये भारत-पाक सामन्याचं समीकरण काय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा लढत होईल का हा चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. यासाठीही समीकरण तयार होऊ शकतं. पाकिस्तान सध्याच्या कामगिरीनुसार गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिल असा अंदाज आहे. शिवाय उर्वरित सर्व सामने जिंकल्यास भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर येईल. त्यामुळे नियमानुसार पहिल्या क्रमांकाचा आणि चौथ्या क्रमांकाचा संघ यांच्यात सेमीफायनल होईल. हा सामना रंगल्यास पुन्हा एकदा पाकिस्तानला त्याच मँचेस्टरच्या मैदानावर खेळावं लागेल, जिथे भारताकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यास त्यांच्यात सेमीफायनल होईल.

श्रीलंका आणि बांगलादेशही स्पर्धेत

बांगलादेश सध्या 7 सामन्यांमध्ये 7 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानसोबतच्या विजयामुळे बांगलादेशचाही सेमीफायनलचा मार्ग मोकळा आहे. सेमीफायनलसाठी बांगलादेशला उर्वरित दोन्ही सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील. बांगलादेशचे पुढील दोन्ही सामने भारत आणि पाकिस्तानसोबत असल्यामुळे मार्ग खडतर आहे.

दुसरीकडे श्रीलंकेने यजमान इंग्लंडवर मात करुन सर्वांना धक्का दिला होता. उर्वरित सामन्यांमध्ये श्रीलंकेने विजय मिळवल्यास त्यांनाही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी मिळू शकते. श्रीलंका सध्या 6 सामन्यात 6 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचे उर्वरित सामने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्ध होणार आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *