‘ओव्हर थ्रो’ प्रकरणावर अखेर आयसीसीने मौन सोडलं

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ओव्हर थ्रो प्रकरणावरुन आयसीसीवर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

'ओव्हर थ्रो' प्रकरणावर अखेर आयसीसीने मौन सोडलं

लंडन : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ओव्हर थ्रो प्रकरणावरुन आयसीसीवर (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत अनेकांनी आयसीसीच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र यावर आयसीसीने प्रतिक्रिया दिली आहे. पंच नियमानुसार निर्णय देतात, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. नियामांच्या आधारावर मैदानातील पंच निर्णय घेतात. आयसीसीच्या नियम पुस्तकात दिलेल्या नियमानुसार मैदानात उपस्थित असलेले पंच निर्णय घेतात, असं आसीसीने म्हटलंय.

विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये झाला. हा सामना बरोबरीत झाल्यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. पण सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत झाला. यानंतर आयसीसीच्या नियमानुसार ज्या संघाने सर्वाधिक चौकार मारले, त्यांना विजयी घोषित करण्यात आलं.

आयसीसीच्या ओव्हर थ्रो आणि सर्वाधिक चौकार या नियमांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. तर काहींनी या नियमांची खिल्ली उडवली. “ओव्हर थ्रोवर इंग्लंडला 6 धावा दिल्या, त्या जागी फक्त 5 धावा होत्या, पण पंचांनी 6 धावा दिल्यामुळे हा वाद आणखी वाढला. पंचांची ही खूप मोठी चूक आहे”, असं माजी पंच सायमन टफेल यांनी म्हटलं होतं.

आयसीसीचा नियम काय सांगतो?

नियम क्रमांक 19.8 : यामध्ये ओव्हर थ्रो किंवा फिल्डरकडून जाणूनबुजून दिल्या जाणाऱ्या धावांची तरतूद आहे.

पेनल्टीची कोणतीही धाव दोन्ही संघांना दिली जाते.

थ्रो फेकण्याच्या वेळेपर्यंत फलंदाज धाव पूर्ण करण्यासाठी पळत असेल, तर ती धाव चौकार किंवा ओव्हर थ्रो म्हणून ग्राह्य धरली जाते.

नेमकं प्रकरण काय?

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात ज्या चेंडूवर वाद निर्माण झालाय, तो इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना अखेरच्या षटकातील चौथा चेंडू होता. या चेंडूवर बेन स्टोक्स फलंदाजी करत होता. स्टोक्सने फटकार मारला आणि तो धाव घेण्यासाठी धावला. पण त्याचवेळी मार्टिन गप्टिलने यष्टीरक्षकाकडे थ्रो फेकला, जो थेट बेन स्टोक्सच्या बॅटवर लागला. बेन स्टोक्सच्या बॅटवर लागून हा चेंडू थेट सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि इंग्लंडला 6 (4+2) धावा मिळाल्या. याच धावांमुळे नंतर इंग्लंडला सामन्यात पुनरागमन करता आलं आणि सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी समान धावा केल्या. पण सर्वाधिक चौकार-षटकार मारणाऱ्या इंग्लंडला विजयी घोषित केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI