IND vs NZ T20: विजयानंतर सूर्यकुमारने शाळेत काय घडलं ते सांगितलं? योजनांबाबतही मत स्पष्ट केलं
टीम इंडियाने टी20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात 154 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे आव्हान भारताने 10 षटकात गाठलं. यानंतर सूर्यकुमारने आपल्या भावना व्यक्त केल्या.

भारताने न्यूझीलंडला तिसऱ्या टी20 सामन्यात डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असंच म्हणावं लागेल. पाटा विकेट असताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना 154 धावांवर रोखलं. खरं तर या खेळपट्टीवर 200 पार धावा करणं अपेक्षित होतं. पण भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. खासकरून जसप्रीत बुमराहने दबाव टाकला त्यातून न्यूझीलंड हतबल झालं. रवि बिश्नोईच्या फिरकीचा सामना करणंही न्यूझीलंडला जड गेलं. हार्दिक पांड्या आणि हार्षित राणा यांनीही न्यूझीलंडला रोखण्यात मदत केली. तर फलंदाजीत भारताने पहिल्या चेंडूवर विकेट गमावली होती. त्यामुळे दबाव वाढेल असं वाटलं होतं. पण तिथेही अंदाज चुकला. भारताने विकेट पडल्यानंतरही त्या षटकात धावा काढल्या. त्यामुळे दबाव भारतावर नाही तर न्यूझीलंडवर वाढला. या विजयानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपलं मत मांडलं आहे. त्याला पहिलाच प्रश्न शाळेचा विचारला गेला.
समालोचकाने विचारलं की, तू शाळेत असताना त्यांनी वर्चस्वाची अशी व्याख्या केली होती का? त्यावर सूर्यकुमार यादव म्हणाली की, ‘मला वाटतं मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मला हा खेळ खेळण्यासाठी खूप वेळ दिला होता. जेव्हा परीक्षा आणि शाळेचा वेळ असायचा तेव्हा त्यांनी मला खूप सुट्ट्या दिल्या. मला वाटतं तिथून मी खूप सराव करायचो, मैदानावर जायचो आणि तिथून शिकायचो.’
कमी षटकात धावांच पाठलाग करण्याबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मला वाटतं की आम्ही याबद्दल बोललो आहोत. हा क्रिकेटचा ब्रँड आहे जो आम्हाला खेळायचा आहे, आम्ही प्रथम फलंदाजी करत असलो किंवा पाठलाग करत असलो तरीही. अर्थात, उदाहरणार्थ, जर आम्ही उद्या 3 बाद 20 किंवा 4 बाद 40 धावा केल्या तर आम्हाला फलंदाजी कशी करायची हे माहित आहे. पण जर तुम्हाला वेगळ्या ब्रँडचे क्रिकेट खेळायचे असेल, तर मला वाटतं की हा पुढे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. मी टॉप2-3 फलंदाजांबद्दल काय म्हणू? त्यांनी माझे काम खूप सोपे केले.’
रवी बिश्नोई दीड वर्षानंतर टी20 क्रिकेट सामना खेळला. त्यावर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘ मला वाटतं की त्याच्या योजना अगदी स्पष्ट आहेत. त्याला त्याचे बलस्थान माहित आहे, तो त्याची गोलंदाजी खरोखर चांगली जाणतो. जेव्हा जेव्हा संघ दबावाखाली असतो तेव्हा तो नेहमीच डिलिव्हरी देतो. त्याला संघात घेऊन खूप छान वाटले. तसेच वरुणलाही चांगली विश्रांती मिळाली.’
