भारताकडून श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा, सेमीफायनल कुणासोबत?

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं, जे भारताने 7 विकेट्स राखून पार केलं. सलामीवीर जोडी रोहित शर्मा (103) आणि लोकेश राहुल (111) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला हा एकतर्फी विजय मिळवता आला.

Sri Lanka vs India, भारताकडून श्रीलंकेचा 7 विकेट्सने धुव्वा, सेमीफायनल कुणासोबत?

लंडन : टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवलाय. साखळी सामन्यातील या अखेरच्या लढतीत श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. भारताने 15 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलंय. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत भारताला विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं होतं, जे भारताने 7 विकेट्स राखून पार केलं. सलामीवीर जोडी रोहित शर्मा (103) आणि लोकेश राहुल (111) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला हा एकतर्फी विजय मिळवता आला.

रोहित शर्माने 94 चेंडूत 2 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. शतक पूर्ण केल्यानंतर तो माघारी परतला. यानंतर लोकेश राहुलनेही शतक केलं. पण लसिथ मलिंगाने राहुलला माघारी पाठवलं. यानंतर आलेला रिषभ पंतही लवकर बाद झाला. कर्णधार विराट कोहली (34*) आणि हार्दिक पंड्याने यानंतर सहज विजय खेचून आणला.

त्याअगोदर श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज (113) आणि लहिरु थिरिमाने (53) यांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने मोठी धावसंख्या उभारली. मात्र श्रीलंकेच्या इतर खेळाडूंना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. भारताकडून जसप्रीत बुमराने 37 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी पाठवलं.

भारताचा सेमीफायनल कुणासोबत?

ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड या चार संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पहिला वि. चौथा आणि दुसरा वि. तिसरा अशी सेमीफायनलमध्ये लढत होईल. भारत सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. या परिस्थितीमध्ये भारत वि. न्यूझीलंड अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे. पण दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवल्यास भारत पुन्हा दुसऱ्या स्थानी येईल आणि ऑस्ट्रेलियाचे 16 गुण होतील. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 326 धावांचं आव्हान दिलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *