IND vs PAK: मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी टीम वाट पाहत होती; पण भारतीय खेळाडूंनी थेट.. ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?
IND vs PAK: आशिया कप 2025 मधील रविवारच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेटर्सपासून अंतर ठेवलं. टॉसदरम्यानही सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन करणं टाळलं.

IND vs PAK: पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखताना टीम इंडियाने आशिया चषक ट्वेन्टी-20 स्पर्धेत रविवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पहलगाम इथला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ याच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांतील संबंध आणखीच बिघडले. भारताने हा सामना खेळू नये अशी मागणी देशातील बहुतांश विरोधी पक्षांकडून करण्यात आली. परंतु केंद्र सरकारने आधीच परवानगी दिल्यामुळे आशिया चषकातील साखळी सामना ठरल्याप्रमाणे पार पडला. मैदानाबाहेरील या तणावाचा मैदानावरही परिणाम दिसून आला. एरवी नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हस्तांदोलन करतात. मात्र, आशिया चषकाच्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी भारताचा सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा सलमान आघा यांनी हस्तांदोलन करणं टाळलं. इतकंच नाही तर, सामन्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवले नाहीत.
भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव संपूर्ण मॅचदरम्यान पहायला मिळाला. षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमार थेट पुढे निघून गेला. त्याने पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहिलंही नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू मैदानावर प्रतीक्षा करत असताना भारतीय खेळाडूंनी आपल्या ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद केला. या सामन्यापूर्वी खेळाडूंचा आणि चाहत्यांचाही प्रचंड उत्साह होता. कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्याबाबत खूप विरोध झाला. परंतु भारताने हा सामना खेळला आणि पाकिस्तानला हरवलं.
😭😭😭🤣🤣🤣👋 https://t.co/GkWSW6K7yL pic.twitter.com/UYvVO0f24l
— sahil (@103of238) September 14, 2025
सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “काही गोष्टी या क्रीडा भावनेपेक्षा वरच्या असतात.” त्याआधी सामन्यानंतरच्या समारंभात सूर्यकुमारने पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांसोबत असल्याची भावना व्यक्त केली होती. “हा विजय आम्ही आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो. आशा आहे की ते आम्हाला प्रेरणा देत राहतील”, असं तो म्हणाला होता. तर पाकिस्तानच्या टीमसोबत हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयाबद्दल सूर्यकुमार पुढे म्हणाला, “आमचं सरकार आणि बीसीसीआय या निर्णयावर एकमत आहेत. आम्ही इथे फक्त खेळ खेळण्यासाठी आलो होतो. मला वाटतं की आम्ही त्यांना योग्य उत्तर दिलं आहे.”
