Shreyas Iyer : लढाई हरलो, युद्ध नव्हे.. श्रेयस अय्यरने करून दाखवलं ! आकडेच बोलतात सर्वकाही..
Shreyas Iyer News: मुंबईविरुद्ध नाबाद 87 धावांची खेळी करत श्रेयस अय्यरने पंजाबला आयपीएल 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचवले. आता अंतिम फेरीत बेंगळुरूविरुद्ध सामना होईल. त्याने आतापर्यंत तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्याचा विक्रम केला.

IPL 2025 क्वॉलिफायर-1 ची मॅच होती. तिथे आरसीबी विरुद्ध पंजाब असा सामना होता, मात्र त्यामध्ये पंजाबचा दारूण पराभव झाला. आरसीबीविरुद्ध हरल्यानंतर श्रेयस अय्यरचा चेहराही प्रचंड पडला, पण तरीही तो शांत आणि आश्व्सत दिसत होता. कारण हे काळे ढग हटतील, पुन्हा प्रकाश येईल याचा त्याला विश्वास होता. त्याच मॅचनंतर त्याने केलेलं विधान अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. आम्ही लढाई हरलोय, युद्ध नव्हे… हे वाक्यच सर्वकाही सांगून जातं. पण श्रेयस अय्यरसाठी ते काही फक्त एक विधान नव्हतं, तर मुंबईच्या संघाविरोधातील युद्धाची (एकप्रकारे) घोषणाच होती. बेंगळुरूच्या पराभवाबद्दल श्रेयसने फारसा विचार केला नाही. मुंबईविरुद्धच्या क्वॉलिफायर- 2 वर त्याने संपूर्म लक्ष केंद्रित केलं, तसं नियोजन केलं आणि परिणामी आता निकाल सर्वांच्या समरच आहे. हो, हे खरं आहे.. श्रेयस अय्यरने त्याच्याच बळावर मुंबईला हरवून पंजाबच्या टीमला आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलंय.
श्रेयस अय्यरने पंजाबला केवळ अंतिम फेरीत पोहोचवले नाही तर अनेक विक्रमही प्रस्थापित केले. मुंबईविरुद्ध नाबाद 87 धावा करून श्रेयस अय्यरने तो सरस का आहे हे सिद्ध केले. त्याला आता आयपीएलचा सरपंच का म्हटलं जातं ते श्रेयस अय्यरच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून सगळ्यांना नक्कीच कळल असेल.पहिली गोष्ट म्हणजे तो पंजाबला अंतिम फेरीत नेणारा पहिला कर्णधार बनला आहे. दुसरी मोठी गोष्ट म्हणजे तो असा खेळाडू आहे ज्याने कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवलं आहे.
खरंच सरपंच आहे श्रेयस अय्यर
हो, श्रेयस अय्यर हा कर्णधार म्हणून तीन वेगवेगळ्या संघांना विजय मिळवून देणारा पहिला खेळाडू ठरला आहे. 2020 साली त्याने दिल्लीला अंतिम फेरीत पोहोचवले. मग 2024 साली त्याने केकेआरला आयपीलचं चॅम्पियन बनवले. आता त्याने पंजाबतर्फे खेळत त्या संघालाही अंतिम फेरीत पोहोचवलं आहे. जर सगळं व्यवस्थित झालं तर पंजाबलाही पहिल्यांदाच जेतेपद मिळू शकेल. विशेष म्हणजे, तीन वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचवण्याचे काम श्रेयस अय्यरने केले आहे. आता उद्या, अर्थात 3 जून रोजी अंतिम फेरीत पंजाबचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. विशेष म्हणजे या दोन्ही संघानी गेल्या 18 वर्षांत एकदाही आयपीएलची फायनल जिंकून ट्रॉफीवर नाव कोरलेलं नाही.
मुंबईने पाहिला करिश्मा
आता मुंबईचा संघ श्रेयस अय्यरचे नाव कधीही विसरणार नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अय्यर याच्यामुळेचे मुंबई इंडियन्सला असा दिवस पहावा लागलाय, ज्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल. खरं तर, प्लेऑफमध्ये 200 धावा केल्यानंतर कधीही न हरण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. पण श्रेयस अय्यरने मुंबईची ती रेषाही लहान केली. मुंबईविरुद्ध, अय्यरने 41 चेंडूत 87 धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला. तो आता कर्णधार म्हणून सलग आयपीएल जेतेपद जिंकणारा आणि दोन वेगवेगळ्या संघांसह जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याचा प्रयत्न करेल.
फलंदाजीची नवी व्याख्या
गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्सना जेतेपद मिळवून देणाऱ्या श्रेयसने काल दबावाखाली परिपक्व खेळी केली आणि मुंबईला हरवत, काल 11 वर्षांत पहिल्यांदाच पंजाबला अंतिम फेरीत नेले. मुंबईच्या धोकादायक गोलंदाजीसमोर विजयासाठीचे 204 धावांचे लक्ष्य गाठणं हे पंजाबसाी सोपं नव्हते पण श्रेयसने आक्रमक फलंदाजीची एक नवीन व्याख्या निर्माण केली. त्याने आठ षटकार आणि पाच चौकारांसह नाबाद 87 धावा केल्या आणि पंजाब किंग्जला पाच गडी गमावून 207 धावा करण्यास मदत करत विजयावर नाव कोरलं . 19 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून श्रेयसने संघाला विजयाकडे नेले. त्याने आयपीएलमध्ये पंजाबसाठी सर्वाधिक 38 षटकार मारण्याचा विक्रमही स्वत:च्या नावावर केला आहे.
