MS Dhoni Birthday : हजारो कोटींंचं नेटवर्थ, कॅप्टन कूलची IPLमधून किती कमाई ? या बिझनेसमधूनही ओढतो खोऱ्याने पैसे
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, कॅप्टन कूल नावाने प्रसिद्ध असलेला अर्थात महेंद्रसिंग धोनी आज 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. त्याचबरोबर त्याची कमाईही दरवर्षी वाढतानाच दिसत आहे.

आज, 7 जुलै 2025 रोजी, भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रिय खेळाडूंपैकी एक, महेंद्रसिंग धोनी चा 44वा वाढदिवस आहे. ‘कॅप्टन कूल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने मैदानावर आपल्या चमकदार कामगिरीने देशाला केवळ नावलौकिक मिळवून दिला नाही तर व्यावसायिक जगातही धुमाकूळ घातला आहे. धोनी हा देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे आणि त्याच्या संपत्तीचा आकडा दरवर्षी नवीन उंची गाठत आहे.
44 वर्षांचा झाला कॅप्टन कूल
एमएस धोनीचा प्रवास रांचीच्या एका साध्या कुटुंबातून सुरू झाला. अतिशय कठोर परिश्रम, मेहनत आणि आवडीने क्रिकेटच्या जगात त्याने त्याचं एक खास स्थान निर्माण केलं. 2004 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर धोनीने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने 2007 चा टी-20 विश्वचषक, 2011 चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्याच्या कर्णधारपदामुळे आणि शांत स्वभावामुळे तो चाहत्यांचा आवडता खेळाडू बनला. याशिवाय, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सोबत पाच जेतेपदे जिंकण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे. या कामगिरीमुळे त्याचे जगभरात करोडो चाहते आहेतच. त्याला खूप आदर, प्रेमही मिळालं पण त्यासोबतच त्याला एक मजबूत आर्थिक आधारही मिळाला.
1000 कोटीहून अधिक नेटवर्थ
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनीच्या कमाईत कोणतीही घट झालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याची एकूण संपत्ती 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 1000 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. निवृत्तीनंतरच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग देखील आहे. आयपीएलच्या 18 सीझनमध्ये खेळल्यानंतर आयपीएलमधून त्याची कमाई 204.4 कोटी रुपये आहे. याशिवाय, धोनीची ब्रँड व्हॅल्यू अजिबात कमी झालेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2025 पर्यंत, एमएस धोनीची ब्रँड व्हॅल्यू 803 कोटी रुपये (सुमारे $95.6 दशलक्ष) होण्याची अपेक्षा आहे.
क्रिकेटशिवाय या बिझनेसमधूनही करतो कमाई
क्रिकेटच्या मैदानावर थंड डोक्याने रणनिती आखून समोरच्या संघाला, खेळाडूला जेरीस आणणाऱ्या धोनीने त्याच्या हुशार बुद्धीचा वापर बिजनेस व्हेंचर्समध्येही केला, जे आज त्याच्या संपत्तीचा एक मोठा भाग आहेत. धोनीने क्रीडा, फॅशन, मनोरंजन आणि रिअल इस्टेटसह अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्याची कंपनी ‘रांची रेज’, हॉकी संघ आणि ‘धोनी स्पोर्ट्स’ सारख्या प्रकल्पांमुळे त्याला एक नवीन ओळख मिळाली. याशिवाय, तो अनेक मोठ्या ब्रँडचा ब्रँड अँबॅसेडर आहे, ज्यातून तो खूप कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसायातून त्याचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधींमध्ये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीच्या मालमत्तेत रांचीमधील एक आलिशान फार्महाऊस, दुबई आणि मुंबईतील मालमत्ता आणि आलिशान गाड्यांचा संग्रह समाविष्ट आहे. धोनीला बाईक्स आणि कारची खूप आवड आहे. त्याच्याकडे हमर एच2, ऑडी क्यू7, मित्सुबिशी पजेरो एसएफएक्स, लँड रोव्हर फ्रीलँडर, फेरारी 599 जीटीओ, जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, निसान जोंगा, पॉन्टियाक फायरबर्ड ट्रान्स एम, जीएमसी सिएरा, मर्सिडीज बेंझ जीएलई आणि रोल्स रॉयस सिल्व्हर शॅडो सारख्या गाड्या आहेत.
