IND vs BAN : बांग्लादेशची टीम कमकुवत वाटते, पण हा 22 वर्षांचा मुलगा त्याच्या टीमसाठी ठरु शकतो ब्रह्मास्त्र
IND vs BAN : बांग्लादेशची टीम अशी कमकुवत वाटतेय. प्रॅक्टिस मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पण बांग्लादेशच्या टीममधील एक 22 वर्षांचा मुलगा उलटफेर घडवण्याची क्षमता राखतो. आज रोहित शर्मा, विराट कोहलीसह टीम इंडियातील दिग्गज फलंदाजांना त्याच्यापासून संभाळून राहण्याची गरज आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील आज दुसरा सामना टीम इंडिया आणि बांग्लादेशमध्ये होणार आहे. बांग्लादेशची टीम स्पिन अटॅकसाठी ओळखली जाते. बांग्लादेशी कॅप्टन नजमुल हसन शांतोने भारताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी आपल्या वेगवान गोलंदाजीवर विश्वास दाखवलाय. असा विश्वास दाखवण्यामागे सर्वात मोठ कारण आहे, 22 वर्षांचा युवा गोलंदाज. आम्ही बोलतोय, नाहिद राणा बद्दल. तो सतत 150 पेक्षा जास्त स्पीडने बॉलिंग करण्यात माहीर आहे. दुबईत टीम इंडियासाठी तो सर्वात मोठा धोका ठरु शकतो.
बांग्लादेशची टीम भारताच्या तुलनेत कमजोर वाटत आहे. पण नाहिद राणाच्या रुपात त्यांच्याकडे एक असं ब्रह्मास्त्र आहे, ज्याच्या बळावर दुबईत उलटफेर होऊ शकतो. 6 फुट 5 इंच उंचीच्या नाहिद राणाने मागच्यावर्षी डेब्यु केला होता. आपल्या पेसमुळे त्याने लवकरच एक वेगळी ओळख मिळवली. बांग्लादेशकडून सर्वात जास्त जलदगतीने चेंडू टाकण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे. त्याने 152 च्या स्पीडने चेंडू टाकला होता. मागच्यावर्षी पाकिस्तान विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये राणाने त्यांच्या फलंदाजांना आपल्या वेगाने हैराण केलं होतं.
विराट कोहलीसह तो दुसऱ्या फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो
दुबईच्या खेळपट्टीवर वेगासह त्याची हाईट फायद्याची ठरु शकते. त्यामुळे त्याला चेंडूला चांगली उसळी देता येईल. दुबईत त्यामुळे तो अजून खतरनाक ठरू शकतो. मागच्यावर्षी भारत दौऱ्यावर टेस्ट सीरीजमध्ये तो जास्त यशस्वी ठरला नव्हता. चेन्नई टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 82 धावा देऊन एक विकेट काढला. दुसऱ्या डावात 21 धावा देऊन 1 विकेट काढला. पण त्याने भारतीय फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करु दिली नव्हती. आता दुबईत रोहित शर्मा, विराट कोहलीसह तो दुसऱ्या फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतो. बांग्लादेशचा कॅप्टन शांतोने सुद्धा भारतीय टीम विरुद्ध यश मिळवण्यासाठी राणाची गोलंदाजी महत्त्वाची ठरेल असं म्हटलं आहे.
त्याचा रेकॉर्ड काय?
नाहिद राणाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जास्त अनुभव नाहीय. पण त्याच्या गोलंदाजीला धार आहे. त्याने आतापर्यंत 6 कसोटी सामन्यात 20 विकेट काढलेत. राणाने 3 वनडे मॅचमध्ये चार विकेट काढलेत. लिस्ट ए चा त्याचा रेकॉर्ड खूप शानदार आहे. त्याने 13 सामन्यात 18.46 च्या सरासरीने 30 विकेट काढलेत.
स्टूलवर चढून थ्रो डाऊनची प्रॅक्टिस
भारतीय टीमला या धोक्याची आधीच कल्पना आहे. त्यासाठी ते तयारी करत आहेत. रिपोर्ट्नुसार टीम इंडियाच्या फलंदाजांना स्टूलवर चढून थ्रो डाऊनची प्रॅक्टिस दिली जातेय. बॉलिंग मशिनवर 150 पेक्षा जास्त गतीच्या वेगवान चेंडूंवर सराव दिला जात आहे.
