Neeraj Chopra : शाब्बास ! नीरज चोप्राची अभिमानास्पद कामगिरी, भालाफेकीत 90 मीटरचे अंतर गाठत नवा विक्रम
Neeraj Chopra : नवे कोच आल्यानंतर नीरज चोप्राने पहिल्याच स्पर्धेत हा इतिहास रचला. दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत 90 मीटरचं अंतर पार करत नीरजने अभिमानास्पद कामगिरी केली. पण...

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने अखेर तो टप्पा गाठला आहे ज्याची तो बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. भारताचा ऑलिंपिक विजेता असलेल्या नीरजने अखेर 90 मीटरचा टप्पा गाठून इतिहास रचला आहे. नीरज चोप्रा हा असा कामगिरी करणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला. दोन वेळा ऑलिंपिक पदक मिळवणाऱ्या नीरजची यावर्षीची ही पहिलीच स्पर्धा होती. दोहा डायमंड लीग स्पर्धेत90.23 मीटरचा शानदार थ्रो करून नीरजने ही ऐतिहासिक कामगिरी केली.
नवे कोच येताच रचला इतिहास
कतारची राजधानी दोहा येथे शुक्रवारी रात्री 16 मे रोजी झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरजने ही अद्भुत कामगिरी केली. गेल्या वर्षी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याचे जेतेपद हुकलं होतं, त्यानंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा होती. एवढंच नव्हे तर, भालाफेक इतिहासातील महान खेळाडू आणि सर्वात लांब भालाफेकचा विक्रम असलेल्या चेक प्रजासत्ताकचे माजी ऑलिंपिक चॅम्पियन जान झेलेझनी यांच्या प्रशिक्षणाखाली देखील नीरजची पहिलीच स्पर्धा होती. अखेर, या दिग्गज खेळाडू आणि कोचचे मार्गदर्शनसफल ठरले आणि नीरजने त्याच्या तिसऱ्या थ्रोमध्ये पहिल्यांदाच 90 मीटरचा कठीण अडथळा पार केला. यापूर्वी, नीरजचा सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर इतका होता, 2022 साली स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याने ही कामगिरी केली होती.
गेल्या हंगामाच्या अखेरीस नीरजने प्रशिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी, तो जर्मन बायोमेकॅनिक तज्ञ क्लॉस बार्टोनिएट्झ यांच्यासोबत काम करत होता, त्यांनी नीरजला ऑलिंपिक सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकण्यास मदत केली. तसेच नीरजला विश्वविजेता आणि डायमंड लीग विजेता बनण्यावतही त्यांच्या कोचिंगचा मोठा वाटा होता. त्यानंतर नीरजने 98.48 मीटरचा जागतिक विक्रम असलेल्या झेलेझनीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. तीन वेळा ऑलिंपिक पदक जिंकणारा आणि तीन वेळा विश्वविजेता झेलेझनीचा प्रभाव लगेच दिसून आला आणि नीरजने 90 मीटरचा टप्पा गाठला, याच कामगिरीची तो बऱ्याच काळापासून वाट पाहत होता.
Neeraj Chopra joins the 90M 𝐂𝐋𝐔𝐁 🔥 👏 🇮🇳 Neeraj Chopra finally broke the 90m barrier for the first time in his career, with a throw of 90.23 at the Doha Diamond League. #NeerajChopra pic.twitter.com/zopYfa45Xk
— Doordarshan Sports (@ddsportschannel) May 16, 2025
ठरला पहिला भारतीय खेळाडू
नीरजने पहिल्या प्रयत्नात 88.44 मीटर भाला फेकला. तर, दुसऱ्या प्रयत्नात तो अपयशी ठरला, त्याचा प्रयत्न बाद ठरला. मात्र त्यानंतरही हार न मानता नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात 90.23 मीटर भाला फेकला. नीरज चोप्रानं त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा 90 मीटरचा टप्पा पार केला आहे. भाला फेकमध्ये 90 मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यामुळे आता नीरजच्या नावे राष्ट्रीय विक्रमाची देखील नोंद झाली आहे.
