NZ vs PAK : पाकिस्तानने T20 टीम बदलली, पण निकाल आधीपेक्षा खूप खराब, न्यूझीलंड विरुद्ध पहिल्याच सामन्यात अशी हालत
NZ vs PAK : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तान टीमने खूप खराब सुरुवात केली. बाबर आजम आणि रिझवान शिवाय खेळणाऱ्या पाकिस्तानी टीमची हालत खूप खराब झाली. न्यूझीलंड आणि पाकिस्तानमध्ये पाच T20 सामन्यांची सीरीज सुरु झाली आहे. पहिला सामना ख्राइस्टचर्चमध्ये झाला.

पाकिस्तानची टीम न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यांच्या दौऱ्याची खराब सुरुवात झाली आहे. दोन्ही टीम्स पाच T20 सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पहिला सामना ख्राइस्टचर्चच्या हेगले ओव्हल मैदानात खेळवण्यात आला. या मॅचमध्ये पाकिस्तानी टीमची खूप वाईट अवस्था झाली. या सामन्यात ना कुठला फलंदाज चालला, ना गोलंदाज. पाकिस्तानी टीममध्ये कोणालाही छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानी टीमला लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावं लागलं. न्यूझीलंडच्या टीमने धमाकेदार विजयासह चांगली सुरुवात केली.
सुरुवातीपासून न्यूझीलंडच्या टीमने या सामन्यावर वर्चस्व गाजवलं. सर्वप्रथम त्यांनी टॉस जिंकला व पाकिस्तानी टीमला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. पहिल्या ओव्हरपासून न्यूझीलंड टीमने सामन्यावर पकड मिळवली. पाकिस्तानचे दोन्ही ओपनर्स खातं उघडण्यात अपयशी ठरले. त्यानंतर विकेट पडण्याचा सिलसिला थांबला नाही. त्यामुळे पाकिस्तानची संपूर्ण टीम 18.4 ओव्हर्समध्ये 91 रन्सवर ऑलआऊट झाली. न्यूझीलंडमध्ये पाकिस्तानची आतापर्यंतची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. पाकिस्तानसाठी खुशदिल शाहने सर्वाधिक 32 धावा केल्या. जहानदाद खानने 17 धावा केल्या.
दमदार गोलंदाजी
न्यूझीलंडकडून जेकब डफीने सर्वाधिक 4 विकेट काढल्या. काइल जेमीसनने त्याला चांगली साथ दिली. त्याने 4 ओव्हरमध्ये 8 रन्स देऊन 3 विकेट काढल्या. ईश सोढीने दोन आणि जकारी फाल्केसने एक विकेट काढला.
पाकिस्तानला फक्त एक विकेट काढता आला
दुसरीकडे न्यूझीलंड टीमला विजयासाठी फक्त 92 धावांच टार्गेट मिळालं. किवी फलंदाजांनी टार्गेट गाठायला फार वेळ लागला नाही. त्यांनी फक्त 10.1 ओव्हरमध्ये 61 चेंडूत टार्गेट गाठलं. न्यूझीलंडकडून सर्वात जास्त धावा टिम सेफर्टने बनवल्या. त्याने 29 चेंडूत 151.72 च्या स्ट्राइक रेटने 44 धावा ठोकल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. फिन एलन 17 चेंडूत 29 धावा काढून नाबाद राहिला. टिम रॉबिन्सनने 15 चेंडूत नाबाद 18 धावा केल्या. पाकिस्तान टीमला फक्त एक विकेट मिळाला. अबरार अहमदने हा विकेट काढला.
पावरप्लेमध्ये पोकळ फलंदाजी
न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तान टीमची टॉप ऑर्डर किती पोकळ आहे ते दिसून आलं. पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये सर्वात जास्त धावा निघतात. तिथे पाकिस्तानी फलंदाज 28 निर्धाव चेंडू खेळले. म्हणजे त्यावर एकही धाव निघाली नाही. पावरप्लेमध्ये त्यांनी चार विकेटही गमावले.
