CWG 2030 : भारताला 20 वर्षांनंतर कॉमनवेल्थ स्पर्धेचं यजमानपद, अहमदाबादमध्ये 2030 साली आयोजन
Commonwealth Games India 2030 : भारत आणि श्रीलंकेकडे आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. त्यानंतर 2030 साली होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेचं आयोजन करण्याचा बहुमान हा भारताला देण्यात आला आहे.

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं 25 नोव्हेंबरला वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान एकूण 55 सामने खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण 20 संघ खेळणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर आता भारताला 2030 साली होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. स्कॉटलँडमधील ग्लासगोमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत अहमदाबादला यजमानपद देण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारताला 2 दशकानंतर यजमानपदाचा मान
भारताला तब्बल 2 दशकांनंतर राष्ट्रकूल स्पर्धेचं यजमानपद मिळालं आहे. भारतात याआधी 2010 साली दिल्लीत राष्ट्रकूल स्पर्धेचा थरार रंगला होता. त्यानंतर आता 2030 मध्ये क्रीडा चाहत्यांना अहमदाबादमध्ये आपल्या लाडक्या खेळाडूंना खेळताना पाहायला मिळणार आहे.
अहमदाबादला स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून तयारी सुरु आहे. अहमदाबादमध्ये नुकतंच कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप, आशियाई एक्वाटिक्स चॅम्पियनशीप या आणि अशा निवडक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच येत्या काळात अहमदाबादमध्ये आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप आणि आशियाई पॅरा-आर्चरी कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
खेळाडूंना मिळणार आधुनिक सुविधा
तसेच सरदार वल्लभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेवमध्ये परिसर विकसित केला जात आहे. या परिसरात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम व्यतिरिक्त एक्वाटिक्स सेंटर, फुटबॉल स्टेडियमचा समावेश असणार आहे. यामध्ये खेळांनुसार आधुनिक साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. खेळाडूंना विविध खेळात सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि भारताचं नाव जागतिक स्तरावर गाजवण्याच्या दृष्टीने क्रीडा मंत्रालयाचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान 2026 साली ग्लासहो कॉमनवेल्थ स्पर्धेत फक्त 10 खेळांचाच समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेतून कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन आणि हॉकी या खेळांना वगळण्यात आलं आहे. हॉकी आणि कुस्ती हे भारताच्या मातीतले खेळ आहेत. हे खेळ वगळल्याने भारताने तीव्र विरोध केला होता. मात्र भारतात 2030 साली होणाऱ्या स्पर्धेत या खेळांचा समावेश करण्यात येणार असल्याचं आयओएने स्पष्ट केलं होतं. नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजीसह कबड्डी आणि खो-खो या पारंपरिक खेळांचा समावेश करण्याची योजना असल्याचं आयओएचे संयुक्त सचिव कल्याण चौबे यांनी म्हटलं होतं.
