पाकिस्तान संघाला भारतात खेळण्यास क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील! आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी येणार?

पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या दहशतवादी कारवायांनंतर भारताने सर्व संबंध तोडले आहेत. क्रीडा मैदानातही भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळत नाही. पण आता दोन स्पर्धांसाठी पाकिस्तानी संघ भारतात येणार आहे. यासाठी क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पाकिस्तान संघाला भारतात खेळण्यास क्रीडा मंत्रालयाकडून हिरवा कंदील! आशिया कप आणि वर्ल्डकपसाठी येणार?
India-Pakistan
Image Credit source: फाईल फोटो
| Updated on: Jul 03, 2025 | 5:20 PM

दहशतवादी कृत्यांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानसोबत सर्व संबंध भारताने तोडले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवला आहे. इतकंच काय तर सिंधु करार देखील स्थगित केला आहे. असं सर्व स्थिती असताना पाकिस्तानचा हॉकी संघ पुढच्या महिन्यात भारतात येणार आहे. भारतात होणाऱ्या हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाने दिली आहे. म्हणजेच पाकिस्तान हॉकी संघ आशिया कप आणि ज्युनियर हॉकी वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतात येणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या सहभागाबाबत शंका होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आम्ही कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतात खेळणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात नाही. पण भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय सामने ही वेगळी बाब आहे. आशिया कप हॉकी स्पर्धा 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे खेळवली जाईल.’

आशिया कप स्पर्धेत भाग सर्वच संघांसाठी महत्त्वाचं आहे. कारण 2026 हॉकी वर्ल्डकपसाठी पात्र फेरी आहे. ही स्पर्धा बेल्जियम आणि नेदरलँडमध्ये होणार आहे. आशिया कप व्यतिरिक्त पाकिस्तानी संघ ज्युनिअर हॉकी वर्ल्डकप खेळण्यासाठीही भारतात येणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणार आहे. मागच्या वेळी पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या ज्युनिअर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने भाग घेतला नव्हता. ही स्पर्धा 2016 मध्ये लखनऊमध्ये आयोजित करण्यात आली होती. पाकिस्तानचा संघ भारतात येणार असेल तर दोन्ही देशातील क्रीडा संबंध पुन्हा प्रस्थापित होत आहेत असं दिसत आहे.

दुसरीकडे, क्रिकेटबाबत वेगळं चित्र आहे. ऑपरेशन सिंदूर आधीपासून दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डात वादाची ठिणगी पडली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळण्यास भारताने नकार दिला होता. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत पार पडले होते. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात सामना खेळणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे बीसीसीआय आशिया कप स्पर्धा यूएईत आयोजित करण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा 4 सप्टेंबर ते 21 सप्टेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे.