नावापुढे 'G' लावून घे, शोएब अख्तरचा 6 वर्षांपूर्वीच रोहित शर्माला सल्ला

शोएब अख्तरने भारत-पाकिस्तान वैर बाजूला ठेवत रोहितच्या फलंदाजीचं तोंड भरून कौतुक केलं आहे.

नावापुढे 'G' लावून घे, शोएब अख्तरचा 6 वर्षांपूर्वीच रोहित शर्माला सल्ला

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने (Indian Cricketer Rohit Sharma) विशाखापट्टनममध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना अगदी घाम फोडला. त्यावेळी जगभरातील क्रिकेट विश्लेषक रोहितची फलंदाजी बारकाईने पाहत होते. यात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचाही (Shoaib Akhtar on Rohit Sharma) समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान हे नातं क्रिकेटमध्ये (India Pakistan Cricket) देखील अनेकदा शत्रुत्वाच्या स्तरावर जातं. मात्र, शोएब अख्तरने हे वैर बाजूला करत रोहितच्या फलंदाजीचं तोंड भरून कौतुक केलं. मी रोहितला 6 वर्षांपूर्वीच त्याच्या नावापुढे G म्हणजेच ग्रेट (Great) लावण्यास सांगितले होतं, याची आठवण शोएबनं सांगितली आहे.

शोएब अख्तरला रोहितच्या क्षमतांचा 2013 मध्येच अंदाज आला होता. शोएब अख्तर म्हणाला, ‘मी रोहितला 2013 रोजी बांग्लादेशमध्येच त्याच्या नावाच्या पुढे G लावून ‘ग्रेट रोहित शर्मा’ असं करण्यास सांगितलं होतं. सध्या भारतात रोहित इतका मोठा फलंदाज कुणीच नाही.’

शोएबने आपल्या यू-ट्यूब चॅनलवर सांगितले, ‘मी रोहितला सांगितलं होतं की त्याने आत्मविश्वास वाढवत त्याच्यातील क्षमतांचा उपयोग करावा. रोहितला हे सर्व कृतीत आणण्यासाठी काहीसा वेळ लागला. मात्र, त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आधीच स्वतःच्या क्षमता दाखवल्या आहेत. आता कसोटीतही त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. रोहितकडे चांगला टायमिंग आहे आणि शॉट्सही चांगले आहेत.’

रोहितने गुरुवारी (3 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी 115 धावांच्या खेळीपासून सुरुवात केली. तो या डावात दमदार 176 धावा करुन बाद झाला. यात त्याच्या 23 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. रोहितने मयांक अग्रवालसोबत खेळताना पहिल्या विकेटसाठी तब्बल 317 धावांची विक्रमी भागीदारी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *