टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतून बांगलादेशनंतर पाकिस्तानचा पत्ता कट! झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 15 दिवसांहून कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. या स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाला असून स्कॉटलँडला एन्ट्री मिळाली आहे. आता पाकिस्तानला बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. त्याला कारणही तसंच आहे.

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भाग घेणार आहेत. असं असताना बांगलादेशच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आयसीसीने त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या जागी स्पर्धेत स्कॉटलँडला जागा मिळाली आहे. आता खरं तर सर्व प्रकरण संपलं असून स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडेल असं क्रीडाप्रेमींना वाटत आहे. पण आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाटकी सुरू झाल्याचं समोर आलं आहे. खरं तर पाकिस्तानचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे त्यांचा तसा काही प्रश्न येत नाही. पण असं असूनही पाकिस्तान चालढकलपणा करत असल्याचं दिसून आलं आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेला 15 दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघाची घोषणा केलेली नाही. त्यामुळे पाकिस्तान टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बांगलादेशच्या भूमिकेला पाकिस्तानची साथ मिळाली होती. श्रीलंकेत सामने खेळवण्यासाठी पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने कौल दिला होता. त्यात बांगलादेशचं म्हणणं ऐकलं नाही तर आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार नाही अशी वल्गना पाकिस्तानने केली होती. आता बांग्लादेश स्पर्धेतून आऊट झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान बॉयकाट करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट बोर्डान टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अजूनही संघाची घोषणा केलेली नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने गुपचूपपणे आयसीसीला संघ पाठवला असण्याची शक्यता आहे. मात्र निवड झालेल्या खेळाडूंची नावं काही उघड झालेली नाहीत. त्यामुळे संभ्रम आहे. तसेच बहिष्काराबात अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची तयारी म्हणून या मालिकेकडे पाहीलं जात आहे. ही मालिका 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठीही संघ निवडलेला नाही. या मालिकेत निवडलेला संघच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार हे निश्चित आहे. पण असं असूनही संघ काही जाहीर केलेला नाही. दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडूंनी सराव थांबवल्याची चर्चा आहे. त्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार टाकणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
