सरांचं पार्थिव शिवाजी पार्कात येताच सचिन ढसाढसा रडला

सरांचं पार्थिव शिवाजी पार्कात येताच सचिन ढसाढसा रडला


मुंबई: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर सर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सरांच्या जावयाने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आचरेकर सरांच्या अंत्यदर्शनासाठी खुद्द सचिन तेंडुलकर तर उपस्थित होताच, शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही अंत्यदर्शनाला गर्दी केली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजप आमदार आशिष शेलार यांचा समावेश होता. रमाकांत आचरेकर यांचं पार्थिव ज्या गाडीतून नेण्यात आलं, त्या गाडीत स्वत: सचिन तेंडुलकर उभा होता. अंत्ययात्रेच्या सुरुवातीपासून सचिन आचरेकरसरांच्या पार्थिवाजवळच होता.

आचरेकर सरांंचं पार्थिव शिवाजी पार्कातील मैदान आणताच सचिन तेंडुलकर ढसाढसा रडला. याच शिवाजी पार्काच्या मैदानातील माती, आचरेकर सरांच्या पार्थिवार ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर 2 मिनिटं मौन पाळलं.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाहीत

पद्मश्री मिळूनही रमाकांत आचरेकर सरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नाही. रमाकांत आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार शासकीय इतमामात न झाल्याने, क्रिकेटच्या चाहत्यांनी राज्य सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी राज्य क्रीडा अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र वाहिले. याबद्दल राज्य क्रीडा उपसंचालकांना विचारले असता, त्यांनी हा प्रोटोकॉल सामान्य प्रशासन विभागाचा असल्याचं सांगत अधिक बोलण्यास नकार दिला.

सर्व शिष्यांनी खांदा दिला

यावेळी आचरेकर सरांच्या सर्व शिष्यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, किरण मोरे यांच्यासह अनेकांनी सरांच्या पार्थिवाला खांदा दिला.

आचरेकर सर कालवश

क्रिकेट जगताला देव देणारे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं बुधवारी 2 जानेवारी रोजी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तेंडुलकरसह अनेक हिरे घडले. यामध्ये विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. आचरेकर सरांच्या निधनाने क्रिकेट विश्वातील द्रोणाचार्य हरपल्याची भावना आहे.

रमाकांत विठ्ठल आचरेकर यांचा जन्म मालवणमध्ये 1932 मध्ये झाला. दादरमधील शिवाजी पार्कात त्यांनी क्रिकेटमधील दिग्गजांना धडे दिले. पुढे याच खेळाडूंनी भारतीय संघात प्रवेश करुन जागतिक क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला.

खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते

रमाकांत आचरेकर सर यांना खेळाडूंच्या फॅक्टरीचे निर्माते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुष्याची अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटच्या मैदानात घालवली. दादरमधील शिवाजी पार्क हेच त्यांचं कार्यक्षेत्र होतं. शिवाजी पार्कात क्रिकेटर घडवून त्यांनी जागतिक क्रिकेटचं लक्ष वेधून घेतलं.

आचरेकर सर हे उत्तम प्रशिक्षक होतेच, शिवाय त्यांनी मुंबई क्रिकेट संघाच्या  निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं. 2010 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.

आचरेकर सरांना मिळालेले पुरस्कार

रमाकांत आचरेकर यांना 1990 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने गौरवण्यात आलं.

2010 मध्ये तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते 7 एप्रिल 2010 रोजी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

2010 मध्येच त्यांना भारतीय संघाचे तत्कालिन प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI