‘मॅन ऑफ द मॅच’ कोण? मांजरेकरांच्या प्रश्नावर जाडेजाची गुगली

मागील वर्षीच्या वर्ल्ड कप 2019 दरम्यान रवींद्र जाडेजाच्या खेळावर प्रश्न उपस्थित करुन टीकेचं लक्ष्य ठरलेले माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आहेत (Ravindra Jadeja on Sanjay Manjrekar).

'मॅन ऑफ द मॅच' कोण? मांजरेकरांच्या प्रश्नावर जाडेजाची गुगली

मुंबई : मागील वर्षीच्या वर्ल्ड कप 2019 दरम्यान रवींद्र जाडेजाच्या खेळावर प्रश्न उपस्थित करुन टीकेचं लक्ष्य ठरलेले माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आहेत (Ravindra Jadeja on Sanjay Manjrekar). न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या विजयानंतर सामनावीर कुणाला घोषित करायला हवं होतं यावर मांजरेकरांनी भाष्य केलं. यानंतर थेट रवींद्र जाडेजानेच मांजरेकरांना प्रतिप्रश्न केला आहे (Ravindra Jadeja on Sanjay Manjrekar).

ऑकलंड येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 सामन्यात के. एल. राहुलला ‘मॅन ऑफ द मॅच’ किताब देण्यात आला. राहुलने या सामन्यात 50 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा केल्या. यावर मांजरेकरांनी प्रतिक्रिया देत या सामन्याचा सामनावीर पुरस्कार न्यूझीलंडला कमी धावात रोखणाऱ्या गोलंदाजांना द्यायला हवा, असं मत व्यक्त केलं.


रवींद्र जाडेजाने 4 षटकांमध्ये 18 धावा देऊन 2 बळी घेतले. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने 4 षटकात 21 धावांच्या बदल्यात 1 बळी घेतला. दोघांच्याही उत्तम गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला केवळ 132 धावांवर रोखले. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी ही कामगिरी सोपी गेली.

याचा आधार घेऊनच मांजरेकर यांनी सामनावीर कुणाला द्यावं यावर भाष्य करत ट्विट केलं. मांजरेकर म्हणाले, ‘या सामन्यासाठी सामनावीराचा पुरस्कार गोलंदाजाला द्यायला हवा होता.’ संजय मांजरेकरांच्या या ट्विटवर रवींद्र जडेजाने गमतीशीर उत्तर दिलं. जडेजा म्हणाला, ‘ज्या गोलंदाजाला सामनावीर पुरस्कार मिळायला हवं असं तुम्हाला वाटतं त्या गोलंदाजाचं नाव काय आहे? कृपया सांगावं.’


जाडेजाच्या या प्रश्नावर मांजरेकरांनीही प्रतिक्रिया दिली. मांजरेकर म्हणाले, ‘हा हा… तुला किंवा बुमराह. बुमराहला मिळणं अधिक योग्य कारण त्याने तिसऱ्या, दहाव्या, अठराव्या आणि विसाव्या षटकात उपयुक्त गोलंदाजी केली.’


संजय मांजरेकर याआधी विश्वचषकादरम्यान रवींद्र जडेजावर केलेल्या टीपण्णीवरुन चांगलेच टीकेचे धनी ठरले होते. जाडेजाला एकदिवसीय सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी न करणारा आणि तुकड्या-तुकड्यात खेळणारा खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. यावर सोशल मीडियावर मांजरेकर चांगलेच ट्रोलही झाले. यानंतरच्या काळात जाडेजाने आपल्या खेळातून संघातील आपली निवड कशी योग्य आहे हे दाखवून दिलं आहे. मांजरेकरांच्या टीकेनंतर जाडेजाने मागील विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळताना सेमीफायनलमध्ये 77 धावांची खेळी केली होती.