VIDEO: युवराजचे 3 आणि हार्दिक पंड्याचे 3 षटकार, कुणाचे भारी?

VIDEO: युवराजचे 3 आणि हार्दिक पंड्याचे 3 षटकार, कुणाचे भारी?

बंगळुरु: रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात गुरुवारी रोमहर्षक लढत झाली. या सामन्यात मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा अवघ्या 6 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारे मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकात 8 बाद 187 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना विराटच्या आरसीबीला 5 बाद 181 धावांपर्यंतच मजल मारता आली. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.

दरम्यान, या सामन्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज युवराज सिंह आणि हार्दिक पंड्या यांचे षटकार कालच्या सामन्यांच वैशिष्ट ठरलं. मुंबई इंडियन्सचा फलंदाज सिक्सर किंग युवराज सिंह फॉर्ममध्ये परतल्याचं चित्र पाहायला मिळालं. युवराजने आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या एकाच षटकात सलग तीन षटकार ठोकले.

युवराज सिंहचे हे षटकार पाहून तो पुन्हा 6 षटकारांची पुनरावृत्ती करणार असं वाटत होतं. मात्र चौथा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेजवळ झेलबाद झाला. ऊंच उडी मारुन मोहम्मद सिराजने त्याचा झेल पकडला. अन्यथा चौथाही सिक्स गेला असता.

युवराजने कालच्या सामन्यात 12 चेंडूत 23 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या युवराजने आधी सावध खेळी केली. त्यानंतर त्याने चहलचे गोलंदाजीवर हल्ला चढवला. चहलला तीन सिक्सर ठोकले. मात्र पुढच्याच चेंडूवर चहलनेच त्याला बाद केलं.

युवराज बाद झाला तरी त्याने उपस्थितांची मनं जिंकली. युवराज सिंह कॅन्सरवर मात करुन मैदानात परतला आहे. त्याची कामगिरी गेल्या काही वर्षांमध्ये चमकदार झालेली नाही. मात्र कॅन्सरवर मात करुन पुन्हा मैदानात परतणं हीच मोठी कामगिरी असल्याचं जाणकार सांगतात.

VIDEO: पाहा युवराजचे 3 षटकार 

हार्दिक पंड्याचे षटकार

दरम्यान, या सामन्यात हार्दिक पंड्याने अंतिम षटकांमध्ये ठोकलेल्या षटकारांमुळे मुंबईला 187 धावांचा टप्पा गाठता आला. पंड्याने 14 चेंडूत 2 चौकार आणि 3 घणाघाती षटकारांसह 32 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमधील मोहम्मद सिराजला ठोकलेला षटकार तर मैदानाबाहेरच गेला.

Published On - 10:38 am, Fri, 29 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI