SMAT 2025: टी20 स्पर्धेत झेल पकडण्यासाठी जीवाची बाजी लावली, काही क्षण वाटलं की…
सय्यद मुश्ताक अली 2025 स्पर्धेतील तामिळनाडु आणि सौराष्ट्र यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात क्रीडारसिक, उपस्थित प्रेक्षक आणि खेळाडूंची धाकधूक वाढवणारी घटना घडली. या सामन्यात झेल पकडता खेळाडू डोक्यावर पडला आणि काही क्षण वाटलं की...

देशांतर्गत सय्यद मुश्तात अली 2025 स्पर्धेचा थरार रंगला आहे. प्रत्येक सामन्यानंतर गणित बदलताना दिसत आहे. साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु असून त्यानंतर सुपर लीग सुरू होईल. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सोमवारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. ग्रुप डी मध्ये तामिळनाडु आणि सौराष्ट्र यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सौराष्ट्रने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 183 धावा केल्या आणि विजयासाठी 184 धावांचं आव्हान दिलं. तामिळनाडूचा शिवम सिंह क्षेत्ररक्षण करताना गंभीररित्या जखमी झाला. ज्या पद्धतीने शिवम पडला तेव्हा वाटलं की आता सगळं संपलं. कारण शिवमचं डोकं जोरात जमिनीवर आदळलं होतं. पण सुदैवाने काही झालं नाही आणि उपस्थितांचा जीव भांड्यात पडला.
ही घटना 11 व्या षटकादरम्यान झाली. सौराष्ट्रकडून फलंदाज विश्वराज जडेजा फलंदाजी करत होता. तर वेगवान गोलंदाज एसाकिमुथू गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर विश्वराजने डीप मिडविकेटच्या दिशेने मारला. सीमारेषेजवळ फिल्डिंग करणाऱ्या शिवम सिंहने पूर्ण ताकद लावत चेंडूच्या दिशेने धावत गेला आणि झेल पकडण्यासाठी उडी मारली. पण असं करताना त्याचा अंदाज चुकला आणि डोक्यावर आदळला. त्याने आदळताना मान थोडी वाकडी केली आणि कानाच्या बाजूला पडला. काही क्षण तो तसाच निचपित पडला होता. त्यामुळे खेळाडूंची धाकधूक वाढली.
मैदानातील खेळाडूंनी त्याच्या दिशेने धाव घेतली. तसेच सामनाही काही काळ थांबला. तामिळनाडूचा फिजिओ धावत मैदानात आला. त्यामुळे चिंता वाढली होती. पण काही क्षणात शिवम स्वत:च उभा राहिला. तसेच इतर खेळाडूंनी त्याच्या हाताला पकडून मैदानाबाहेर नेलं.
शिवम सिंहने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केलं आहे. ही त्याचा तिसरा सामना आहे. मागच्या दोन सामन्यात काही खास केलं नाही. पहिल्या सामन्यात 10 आणि दुसऱ्या सामन्यात 23 धावा केल्या. शिवम सिंह यापूर्वी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळला आहे. पण 2025 मध्ये त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यात त्याने 2 धावा केल्या होत्या.
