Jaspreet Bumrah : बुमराहला सांगा, तुझी गरज नाही.. माजी गोलंदाजाच्या विधानाने खळबल
इंग्लंड दौऱ्यावर जसप्रीत बुमराह 5 पैकी फक्त 3 कसोटी सामने खेळला आणि, त्या तीन सामन्यांपैकी एकाही मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही. या संपूर्ण मालिकेदरम्यान, बुमराहच्या गोलंदाजीपेक्षा त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंट आणि फिटनेसबद्दल जास्त चर्चा झाली.

नवीन कर्णधार आणि तरुण खेळाडूंसह टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. टीम इंडियाच्या या दमदार कामगिरीमध्ये, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीचा आणि त्याच्या वर्कलोड व्यवस्थापनाचा मुद्दाही कायम चर्चेत राहिला. या मुद्द्यावर तज्ञ आणि चाहते यांच्यात आता दोन गट पडले असून अनेक दिग्गज तर बुमराहवर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, एका माजी गोलंदाजानेही या मुद्यावर भाष्य करत बुमरहाला सुनावलं आहे. इंग्लंडचा माजी गोलंदाज मोंटी पनेसर याच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद सिराज हाँ टीम इंडियासाठी सामने जिंकू शकतो आणि अशा परिस्थितीत बुमराहला एक विशेष संदेश देण्याची गरज आहे.
बुमराहवर प्रश्न
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराह फक्त 3 सामने खेळला. या दौऱ्यात बुमराह फक्त 3 सामने खेळेल हे आधीच ठरले होते. योगायोगाने, बुमराह ज्या तीन मॅचमध्ये खेलला, त्यापैकी एकही सामना टीम इंडिया जिंकू शकली नाही आणि ज्या दोन्ही सामन्यांच्या आधारे मालिका अनिर्णित राहिली त्या सामन्यांमध्ये बुमराह हा भारतीय संघाचा भाग नव्हता. त्या दोन्ही सामन्यांमध्ये सिराजने प्रत्येकी 5 बळी घेत बॉलिंग अटॅकचे उत्कृष्ट नेतृत्व केले. अशा परिस्थितीत, फिटनेस आणि वर्कलोड व्यवस्थापनामुळे बुमराहवर पूर्णपणे विश्वास ठेवता येईल का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत? त्याला अशी मोकळीक द्यावी का?
काय म्हणाला माँटी पनेसर ?
बुमराहचे महत्त्व आणि त्याची खासियत लक्षात घेता यावर अनेक मते समोर येत आहेत. भारतीय वंशाचा इंग्लिश फिरकी गोलंदाज माँटी पनेसरनेही या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीत पनेसर याला विचारण्यात आलं की, टीम इंडियाने बुमराहशिवाय खेळण्याचा विचार करावा की त्याला फक्त परदेशात खेळवायचे? यावर इंग्लिश स्पिनरने असं सुचवलं की, बुमराहला परदेशात सर्व सामने खेळण्यास सांगितले पाहिजे. पनेसर म्हणाले, “भारतीय संघ बुमराहशिवायही मायदेशात कोणालाही हरवू शकतो परंतु परदेशी कसोटी सामन्यांमध्ये तो एक्स-फॅक्टर आहे.” ते (कर्णधार आणि प्रशिक्षक) त्याला (बुमराहला) सांगू शकतात की आम्हाला घरच्या कसोटीसाठी तुझी गरज नाही पण परदेशातील कसोटीसाठी तुझी गरज भासेल.
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका खेळणार का बुमराह ?
भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे माँटी पनेसरची सूचना स्वीकारतील की नाही हे पुढील 2 महिन्यांत कळेल. भारतीय संघाला पुढील 2 कसोटी मालिका मायदेशात खेळायच्या आहेत, ज्यामध्ये ते प्रथम वेस्ट इंडिज आणि नंतर दक्षिण आफ्रिकेचा सामना करतील. बुमराह या दोन्ही मालिका खेळेल की दोन्हीमधून विश्रांती घेईल? यावरून संघ व्यवस्थापनाचे नियोजन स्पष्ट होऊ शकते. तथापि, पनेसर याने जे म्हटले, ते विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, जेव्हा बुमराहने कसोटी पदार्पण केले तेव्हा दिसून आले आणि पहिल्या 3 वर्षांत, त्याने त्याचे सर्व कसोटी सामने परदेशात खेळले, तर त्याला भारतात विश्रांती देण्यात आली होती.
