श्रीसंतने राहुल द्रविडला शिवी दिली होती : माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:45 PM, 3 May 2019

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मेंटल कंडीशनिंग प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी त्यांच्या नवीन पुस्तकात काही धक्कादायक खुलासे केले आहेत. पॅडी अप्टन यांचं ‘द बेअरफूट कोच’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं. या पुस्तकात पॅडी अप्टन यांनी आयपीएल 2013 च्या गाजलेल्या स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यातील त्या घटनांवर प्रकाश टाकला, ज्या घटनांमुळे या घोटाळ्याचा खुलासा झाला होता. पॅडी अप्टन यांनी 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सचं मुख्य प्रशिक्षक पद सांभाळलं होतं.

पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात क्रिकेटर श्रीसंतबाबत अनेक खुलासे केले आहेत. “श्रीसंतला संघात (राजस्थान रॉयल्स) जागा न दिल्याने तो नाराज होता. त्यामुळे त्याने द्वेषात येऊन माझ्यासाठी आणि राजस्थान रॉयल्सचे कर्णधार राहुल द्रविडसाठी अपशब्द वापरले होते. त्यानंतर 16 मे 2013 रोजी श्रीसंतला अटक होण्याच्या 24 तासापूर्वी त्याला संघातून हाकलून लावण्यात आलं होतं”, असं पॅडी अप्टन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं.

“श्रीसंतकडून वारंवार होणाऱ्या वाईट वागणुकीला कंटाळून आम्ही त्याला संघातून बाहेर केलं. त्याची वागणूक अत्यंत चुकीची आणि संघासाठी हानिकारक होती”, असंही पॅडी अप्टन यांनी स्पष्ट केलं. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, श्रीसंतचा राग हा साधारण नसल्याचंही पॅडी अप्टन यांनी सांगितलं.

“जर कुणी श्रीसंतला भावूक व्यक्ती म्हणत असेल, तर मी त्याच्याशी सहमत नाही. तुमच्यात भावनिक उद्रेक होऊ शकतो. पण,  संघात खेळू शकत नसल्याने इतक्या तीव्रपणे व्यक्त होणे चुकीचं आहे. आम्ही गेल्या सात सिझनपासून प्रत्येकवेळी 13 खेळाडूंना ते खेळू शकत नसल्याचं सांगतो. त्यामुळे त्यांना आमच्यावर नाराज होण्याचा हक्क आहे. पण, यापद्धतीने नाराजी व्यक्त करण्याचं कुठलेही कारण नाही”, असे पॅडी अप्टन यांनी श्रीसंतच्या वागणुकीबाबत बोलताना सांगितले.

पॅडी अप्टन हे खोटं बोलत आहेत : श्रीसंत

दुसरीकडे, श्रीसंतने या घटनेचं खंडण केलं आहे. पॅडी अप्टन हे खोटं बोलत असल्याचा दावा श्रीसंतने केला. त्याने कुणासाठीही अपशब्द वापरले नसल्याचं म्हटलं. “हे माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक आहे. काहीवेळाच्या प्रसिद्धीसाठी पॅडी अप्टन हे सर्व करत आहेत. मी फक्त इतकंच सांगू शकतो की, मी ज्यांच्यासोबतही खेळलो, त्यांच्याबाबत माझ्या मनात आदर आहे. मी आशा करतो की पॅडी अप्टन यांनी स्वत:चा तरी मान राखावा आणि इतरांना आनंदी करण्यासाठी त्यांनी स्वत:ला विकू नये”, असं श्रीसंतने सांगितलं.

2013 आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण

आयपीएल 2013 मध्ये श्रीसंतसोबत राजस्थान रॉयल्सचे दोन खेळाडू अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांना दिल्ली पोलिसांनी आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर दिल्ली न्यायालयाने या तिघांनाही निर्दोष मुक्त केलं. बीसीसीआयनेही या तिघांवर संपूर्ण आयुष्यभरासाठी खेळण्यावर बंदी घातली होती. मात्र, काहीच महिन्यांपूर्वी बीसीसीआयने श्रीसंतवरील बंदी उठवली.

पॅडी अप्टन यांनी यापूर्वीही त्यांच्या एका पुस्तकात क्रिकेटर गौतम गंभीर हा मानसिक दृष्ट्या कमकुवत खेळाडू असल्याचा दावा केला होता.

संबंधित बातम्या :

यंदाचा सर्वोत्तम गोलंदाज IPL मधून आऊट

शाहीद आफ्रिदी तब्बल 23 वर्षे खोटं बोलला, आयसीसी कारवाई करणार?

क्रिकेट वर्ल्डकपआधी भारतीय संघाची गुपितं आयपीएलमध्ये उघड?

23 वर्षीय क्रिकेटपटूला बलात्कारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा