Sunil Gavaskar : गौतम गंभीरच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना सुनील गावस्कर यांचे विचार करायला भाग पाडणारे काही प्रश्न
Sunil Gavaskar : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाने कसोटी मालिका गमावली. मायदेशातील हा मोठा पराभव आहे. या मानहानीकारक पराभवानंतर टीमचे हेड कोच गौतम गंभीर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दिग्गज सुनील गावस्कर यांनी आता अशी मागणी करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. अनेक माजी खेळाडूंनी गौतम गंभीर यांच्या रणनितीवर आणि मायदेशातील सलग दोन क्लीन स्वीपवरुन प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. अनेकांचं असं मत आहे की, टेस्ट फॉर्मेटसाठी वेगळा कोच हवा. माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी या मुद्यावर आपलं मत मांडलं. “टीम इंडियाच्या पराभवामध्ये फक्त एकट्या गौतम गंभीरची चूक नाहीय तर खेळाडूंनीही मैदानावर चांगलं प्रदर्शन केलेलं नाही” असं गावस्कर म्हणाले. “गौतम गंभीर कोच आहे. कोच टीमला तयार करतो. आपल्या अनुभवाने सल्ला देतो. पण मैदानात तर खेळाडूंना प्रदर्शन करायचं आहे” असं गावस्कर यांनी गौतम गंभीर यांच्या समर्थनात मुद्दा मांडला. ते इंडिया टुडेवर बोलत होते.
गंभीर यांच्या नेतृत्वाखालीच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आशिया कप जिंकला. आता मायदेशात पराभव झाल्यानंतर सर्वच जण गंभीर यांच्यावर तुटून पडलेत. जे उत्तर मागतायत त्यांना माझा प्रश्न आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तुम्ही काय केलं? आशिया कप जिंकल्यानंतर काय केलं? त्यावेळी कोणी असं म्हणालं का, गंभीरचा कॉन्ट्रॅक्ट लाइफ टाइम करा. टीम हरल्यानंतर कोचला दोष देताय असं बचाव करताना म्हणाले.
विजयावर कोणी क्रेडिट देत नाही
गावस्कर यांनी न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅकुलम यांचं उदहारण दिलं. ते इंग्लंडच्या तिन्ही फॉर्मेटचे कोच आहेत. अनेक देशात एकच कोच सर्व फॉर्मेट संभाळतो. गावस्कर म्हणाले की, “पराभवानंतर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. विजयावर कोणी क्रेडिट देत नाही. क्रिकेटच्या पीचवर खराब प्रदर्शनासाठी एकट्या कोचला जबाबदार धरु नये” माजी ऑफस्पिनर आर. अश्विनने सुद्धा गंभीरचा बचाव केला. गंभीरला हटवण्याची मागणी चुकीची आहे. खेळाडूंनी आपली जबाबदारी निभावली नाही. “ड्रेसिंग रुममध्ये जे महत्वाचे निर्णय घेतले जातात, त्यात कोचचा सहभाग असतो. पण या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी खेळाडूंवर असते” “कोच बॅट उचलून मैदानात खेळायला जाऊ शकत नाही. तो फक्त खेळाडूंशी बोलण्याचं आपलं काम करु शकतो” असं अश्विन म्हणाला.
