IND vs AUS : टीम इंडिया नव्हे पाऊसच करणार ऑस्ट्रेलियाचा पत्ता कट ?
India vs Australia, T20 World Cup 2024: सेंट लूसियामध्ये भारत वि. ऑस्ट्रेलिया असा सामना होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक दिवस आधीच ग्रोस आयलेट शहरातील हवामान बिघडलं आणि पाऊस झाला. आता सोमवारी स्थिती कशी असेल आणि त्याचा सेमीफायनलवर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेऊया.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा सध्या जोशात सुरू आहे. सोमवार, 24 जून अर्थात आज जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुपर-8 मध्ये सामना रंगेल तेव्हा कोट्यवधि भारतीयांच्या मनात फक्त एकच शब्द असेल तो म्हणजे – बदला. 19 नोव्हेंबरचा बदला, ज्या दिवशी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला नमवल्याने कोट्यवधी भारतीयांचं मन दुखावलं होतं. आता आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांना स्पर्धेबाहेर घालवण्यातीची चांगली संधी भारतीय संघाकडे आहे, त्यामुळे 19 नोव्हेंबरचं दु:ख थोडं तरी कमी होईल. पण भारतीय संघाला आज तशी संधी मिळेल की नाही हे सेंट लूसियाच्या हवामानावर अवलंबून असेल.
दोन्ही संघांचा हा या फेरीतील शेवटचा सामना आहे. सलग 2 सामने जिंकून टीम इंडिया अव्वल स्थानावर आहे आणि उपांत्य फेरीच्या अगदी जवळ पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघही उपांत्य फेरी गाठणार हे निश्चित मानले जात होते पण अफगाणिस्तानकडून झालेल्या पराभवामुळे त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले. त्यामुळे आता त्यांना उपांत्य फेरीत पोहोचायचे असेल तर आजच्या सामन्यात त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघाचा पराभव करून वीज मिळवावाच लागेल. ऑस्ट्रेलियन संघ आजची मॅच हरला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येईल. मात्र पराभवापेक्षा त्यांना आजच्या हवामानाचेच जास्त टेन्शन आहे.
कसे असेल सेंट लूसियाचे हवामान ?
दोन्ही संघांमधील हा सामना सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट मैदानावर होणार आहे परंतु या शहराचे हवामान चांगले नसल्याने काहीही होऊ शकतं. सामन्याच्या एक दिवस आधीच, रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला आणि रात्री उशिराही पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा सामना सेंट लुसियाच्या वेळेनुसार सकाळी 10.30 वाजल्यापासून खेळवला जाईल परंतु त्यामध्येही सकाळी पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. हवामान विभागाच्या अहवालानुसार, सकाळी 7 ते 9 या वेळेत पाऊस अपेक्षित आहे आणि जर असे झाले तर सामना वेळेवर सुरू होणं कठीण आहे. त्यानंतर पाऊस झाला नाही तरी ते मैदान सामना खेळण्यासाठी योग्य असेल का , हाही एक मोठा प्रश्न आहे..
सामना रद्द झाला तर काय ?
सुपर 8 मधील सामन्यांसाठी कोणताही राखीव दिवस नाही. त्यामुळे आज पाऊस झाला तर टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठीही कोणताही राखीव दिवस नाही. पावसामुळे आजचा सामना रद्द झाला तरी भारतीय संघाला फरक पडणार नाही, उलट ते न खेळताही त्यांना सहज सेमी-फायनलचं तिकीट मिळेल. सामना रद्द करण्यात आला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात येईल. त्यानंतर भारतीय संघाचे एकूण 5 गुण होतील. पण ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी यामुळे वाढेल. कारण या सामन्यात विजय मिळाला तर त्यांना २ गुण मिळतील पण सामना रद्द झाल्यास त्यांना अवघा १ गुण मिळेल. अशा परिस्थितीत पुढच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील आणि ऑस्ट्रेलिया थेट स्पर्धेबाहेर फेकली जाईल. त्यामुळे आता आज पाऊस पडतो की भारतीय संघ वि ऑस्ट्रेलियाची लढत पहाला मिळते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
