IND vs NZ : गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक, फक्त एक छोटासा बदल आणि न्यूझीलंडची उडाली धूळधाण
IND vs NZ 3rd T20i : न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. आज सलग तिसऱ्या टी20 मध्ये टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियासमोर न्यूझीलंडची टिम टिकावच धरु शकली नाही.

न्यूझीलंड विरुद्ध टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाने कमाल केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यात सपाटून मार खाल्ला होता. त्यामुळे परदेशी भूमीवर न्यूझीलंडमध्ये टीम इंडियाचं प्रदर्शन कसं असेल हा सर्वच क्रिकेट चाहत्यांसाठी चिंतेचा विषय होता. कारण आयर्लंड, इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाची हालत पाहिली होती. न्यूझीलंडमध्ये हवामान, खेळपट्ट्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. याआधीच्या भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याचा अनुभव पाहिला तर टीम इंडिया जिंकणार का? हा प्रश्न तमाम क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. न्यूझीलंड आधी वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज मध्ये भारतीय गोलंदाजांनी खूप मार खाल्लेला. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये काय अवस्था होणार? असा अनेकांच्या मनात प्रश्न होता. पण श्रेयस अय्यरच्या टीम इंडियाने सर्वांनाच निरुत्तर केलय. सगळ्या टीकाकारांची तोंड बंद केली आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध पहिले तिन्ही टी20 सामने जिंकून सीरीजमध्ये 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतले अजून दोन सामने बाकी आहेत. आज तिसऱ्या सामन्यात अभिषेक शर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 38 चेंडूत 113 धावा फटकावल्या. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना चोप-चोप चोपलं. 9 चौकार आणि 11 षटकार असं त्याचं प्रदर्शन होतं. पण आजच्या सामन्यातील विजयाचं काही श्रेय वैभव सूर्यवंशीला सुद्धा द्याव लागेल. गौतम गंभीरने तिसर्या टी20 मध्ये एक छोटासा बदल केला. तो टीमच्या पथ्यावर पडला.
चार बाऊंड्री आणि चार सिक्स
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन हे टीम इंडियाकडे दोन नियमित ओपनर आहेत. त्यांच्या संघातील स्थानाला धक्का लावणार नाही हे टीम मॅनेजमेंटने आधीच स्पष्ट केलय. त्यानुसार आजच्या सामन्यात हे दोघे सुद्धा खेळले. फक्त संजू सॅमसन आज ओपनरऐवजी तिसऱ्या स्थानावर आला आणि वैभव ओपनिंगला आला. मागच्या सामन्यात वैभव तिसऱ्या नंबरवर आलेला तेव्हा फार चमक दाखवू शकला नव्हता. आज संजू सॅमसन तिसऱ्या नंबवर फक्त 18 धावा करु शकला. पण वैभवने छाप उमटवली. ओपनिंगला आलेल्या वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 45 धावा फटकावल्या. त्याने चार बाऊंड्री आणि चार सिक्स मारल्या.
