24 तासांत दुसरं घर शोध..; चेतेश्वर पुजाराने पत्नीला का दिलेला असा इशारा?
चेतेश्वर पुजाराने मॅचच्या आधी पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीला रुम सोडण्यास सांगितलं होतं. हा किस्सा खुद्द त्याची पत्नी पूजाने एका मुलाखतीत सांगितला होता. यामागचं कारणसुद्धा तिने स्पष्ट केलं होतं. हा नेमका किस्सा काय होता, ते वाचा..

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2023 नंतर त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं नव्हतं. सततच्या प्रयत्नांनंतरही मैदानावर वापसी न झाल्याने अखेर रविवारी 24 ऑगस्ट रोजी त्याने सर्व फॉरमॅट्समधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलं. चेतेश्वर पुजारा त्याच्या शिस्तप्रिय स्वभावासाठी आणि धैर्यासाठी ओळखला जातो. परंतु यात शिस्तप्रिय स्वभावाने अनेकदा त्याची पत्नी पूजाला काही समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याशी संबंधित एक किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावेळी पुजारा सिडनी टेस्टसाठी तयारी करत होता. तेव्हा त्याने पत्नीला त्याच्यासोबत हॉटेलमध्ये थांबू नये असं स्पष्ट सांगितलं होतं.
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत त्याची पत्नी पूजाने हा किस्सा सांगितला होता. ती म्हणाली, “टेस्ट मॅचच्या तीन दिवस आधीच चेतेश्वरने मला स्पष्ट सांगितलं होतं की तुझ्याकडे 24 तासांचा वेळ आहे, तू तुझ्यासाठी दुसरी रुम शोधून घे. माझ्यासोबत हॉटेलमध्ये राहिलीस तर मला खेळावर लक्ष केंद्रीत करता येणार नाही.” यावरून दोघांमध्ये थोडी बाचाबाचीसुद्धा झाली होती. पूजाने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की हे अनोळखी शहर आहे आणि छोट्या मुलीला घेऊन दुसरं हॉटेल शोधणं सोपी गोष्ट नाही. जोपर्यंत नवीन रुम मिळत नाही, तोपर्यंत त्याच हॉटेलमध्ये राहण्यासाठी तिने पुजाराकडे विनंती केली होती.
View this post on Instagram
अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर पूजाने हॉटेलच्या जवळपास एक अपार्टमेंट भाड्याने घेतलं आणि मुलीसोबत काही दिवसांसाठी तिथे शिफ्ट झाली. परंतु हे सर्व त्यावेळी करणं खूप कठीण होतं, असं पूजाने सांगितलं. तरीसुद्धा पतीच्या निर्णायाचा आदर करण्यासाठी त्याचं म्हणणं ऐकल्याचंही तिने स्पष्ट केलं. चेतेश्वर पुजाराची शिस्त अनेकदा मैदानावरही पहायला मिळाली. त्या सीरिजमध्ये पुजाराने शतक ठोकलं होतं. या विजयानंतर पूजाचीही सर्व नाराजी दूर झाली होती.
चेतेश्वरने 2010 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमधून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने टेस्ट क्रिकेटमध्येच आपली विशेष ओळख निर्माण केली. पुजारा टॉप-ऑर्डरमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. त्याने 100 हून अधिक टेस्ट मॅचेस खेळल्या आहेत. तर 7000 हून अधिक धावा आणि जवळपास 19 शतकं त्याच्या नावावर आहेत. परंतु ODI आणि T20 मध्ये त्याला फारसं यश मिळालं नाही.
