कामाच्या व्यापात नोटिफिकेशनचा त्रास? मग ‘हा’ मोड करा ऑन
महत्त्वाच्या कामात फोनची 'टिंग टिंग'... याने तुम्हीही वैतागला असालच! एअरप्लेन मोड टाकला तर महत्त्वाचे कॉल्सही मिस होतात! पण आता या रोजच्या कटकटीवर आहे एक सोपा आणि स्मार्ट फिचर. तर मग कोणता आहे हा भन्नाट फिचर ? चला जाणून घेऊया.

आजकाल स्मार्टफोन म्हणजे आपल्या हातातील जगच! खरेदीपासून ते बँकेच्या कामांपर्यंत आणि ऑफिसच्या महत्त्वाच्या मिटींगपासून ते ऑनलाइन अभ्यासापर्यंत, सगळं काही मोबाईलवरच होतं. ही सोय नक्कीच आहे, पण या सोयीसोबत एक मोठी डोकेदुखीही येते, ती म्हणजे सतत येणारे कॉल्स आणि नोटिफिकेशन्स! विचार करा, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मिटींगमध्ये आहात, रात्री शांत झोपला आहात, गाडी चालवत आहात किंवा मन लावून अभ्यास करत आहात आणि अचानक फोन वाजतो किंवा मेसेजचा आवाज येतो… सगळं लक्ष विचलित होतं, कामाचा किंवा आरामाचा विचका होतो. अशावेळी अनेकजण फोन ‘Airplane Mode’ वर टाकतात. पण त्यामुळे तुमचं नेटवर्क पूर्णपणे बंद होतं आणि महत्त्वाचे कॉल्स किंवा इंटरनेट कनेक्शनही मिळत नाही. मग यावर उपाय काय? तर उत्तर आहे ‘Do Not Disturb’ (DND) Mode!
काय आहे हा DND मोड?
DND मोड हे तुमच्या स्मार्टफोनमधील एक असं जबरदस्त फीचर आहे, जे चालू केल्यावर तुमच्या फोनवर येणारे अनावश्यक कॉल्स आणि नोटिफिकेशन्स सायलेंट होतात, म्हणजे त्यांचा आवाज येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला ते मिळतच नाहीत; ते येतात, पण तुम्हाला कोणताही व्यत्यय आणत नाहीत. तुम्ही शांतपणे तुमचं महत्त्वाचं काम करू शकता किंवा आराम करू शकता.
DND मोडची खासियत
तुम्ही ठरवू शकता की कोणत्या ॲप्सचे नोटिफिकेशन्स सायलेंट करायचे आणि कोणते चालू ठेवायचे. तुम्ही काही महत्त्वाच्या कॉन्टॅक्ट्सना ‘Exception’ लिस्टमध्ये टाकू शकता, जेणेकरून त्यांचे कॉल्स किंवा मेसेज DND मोडमध्येही तुम्हाला मिळतील. तुम्ही हा मोड एका विशिष्ट वेळेसाठी Schedule सुद्धा करू शकता.
Android फोनवर DND मोड कसा चालू कराल?
तुमच्या फोनच्या Settings मध्ये जा.
सर्च बारमध्ये “Do Not Disturb” टाईप करा किंवा फोनच्या वरून खाली ओढल्यावर दिसणाऱ्या Quick Settings पॅनलमध्ये DND चा अर्धचंद्राकृती Icon शोधा.
DND मोडवर टॅप करून तो On करा.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही तिथेच Schedule आणि Customize करण्याचे पर्याय मिळतील.
iPhone वर DND मोड कसा चालू कराल?
तुमच्या iPhone च्या मॉडेलनुसार, स्क्रीनवर वरून खाली किंवा खालून वर स्वाईप करून Control Center उघडा.
तिथे “Focus” या पर्यायावर टॅप करा.
आता “Do Not Disturb” वर क्लिक करा. तो चालू किंवा बंद करा.
Android प्रमाणेच, तुम्ही इथेही वेळेनुसार आणि गरजेनुसार DND सेट करू शकता. ‘सेटिंग्ज’ मधील ‘फोकस’ पर्यायात जाऊन तुम्ही महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स किंवा ॲप्स निवडू शकता ज्यांचे नोटिफिकेशन्स DND मध्येही येतील.
