EMI वर फोन घेताय? ‘या’ चुका टाळा, नाहीतर स्वस्त फोन महागात पडू शकतो!
नवीन स्मार्टफोन घेणं प्रत्येकाच्या इच्छित गोष्टींपैकी एक असतो, पण बजेटचा प्रश्न खूपदा समोर येतो. अशा परिस्थितीत EMI चा 'सोपा' हफ्ता अनेकांना आकर्षित करतो. पण थांबा! काही आकर्षक ऑफर्स आणि सवलतींच्या मागे अनेकदा काही अशा चुका दडलेल्या असू शकतात, ज्यामुळे तुमचा 'स्वस्त' फोन नकळतपणे 'महाग' पडू शकतो. त्यासाठी, EMI वरील स्मार्टफोन खरेदी करताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बजेटमध्येच सर्वोत्तम डील मिळवू शकता, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजकाल नवीन स्मार्टफोन घेणं अनेकांसाठी गरजेचं झालं आहे. पण चांगला फोन म्हटलं की किंमतही जास्त असते. एकदम एवढे पैसे नसतील, तर EMI चा पर्याय खूप आकर्षक वाटतो. अनेक ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्स ‘No Cost EMI’ किंवा कमी हफ्त्यांच्या ऑफर्स देतात. यामुळे बजेट नसतानाही महागडा फोन घेणं शक्य होतं.
पण EMI चा पर्याय निवडताना अनेकजण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि ‘स्वस्त’ मिळवण्याच्या नादात नकळतपणे तो फोन त्यांना जास्त महागात पडतो. जर तुम्हीही EMI वर फोन घेण्याचा विचार करत असाल, तर खालील काही सामान्य चुका टाळणं आणि काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे:
१. अनेकजण एकाच वेबसाइटवर किंवा दुकानात ऑफर बघतात आणि लगेच फोन घेण्याचा निर्णय घेतात. कोणताही EMI प्लॅन फायनल करण्याआधी, त्याच फोनसाठी इतर वेबसाइट्सवर किंवा दुकानांमध्ये काय ऑफर्स आहेत, व्याजदर किती आहे, Processing Fee आहे का, हे नक्की तपासा. कदाचित तुम्हाला दुसरीकडे जास्त चांगली डील मिळू शकते.
२. EMI म्हणजे दर महिन्याला थोडे थोडे पैसे द्यायचे, त्यामुळे आपण महागडा फोन घेऊ शकतो, असा विचार करून अनेकजण आपल्या बजेटच्या बाहेरचा फोन निवडतात. या ऐवजी फोनची एकूण किंमत, त्यावर लागणारं व्याज आणि इतर शुल्क लक्षात घेऊनच निर्णय घ्या. दर महिन्याचा हफ्ता तुमच्या महिन्याच्या खर्चात सहज बसतोय ना, याची खात्री करा.
३. EMI चा अर्ज भरताना त्यात बारीक अक्षरात लिहिलेल्या अटी व शर्ती न वाचताच सही करणं ही एक खूप मोठी चूक ठरू शकते. कोणताही करार करण्यापूर्वी तो काळजीपूर्वक वाचा. व्याजदर, प्रोसेसिंग फी, उशिरा पेमेंट केल्यास लागणारा दंड, लोन लवकर फेडण्याची सोय आहे का आणि त्यासाठी काही शुल्क आहे का, या सगळ्या गोष्टी नीट समजून घ्या. काही छुपे खर्च आहेत का, हे तपासा.
४. महिन्याचा हफ्ता कमी दिसावा म्हणून अनेकजण जास्त महिन्यांचा EMI प्लॅन निवडतात. पण लक्षात ठेवा, जेवढा जास्त कालावधी, तेवढं जास्त व्याज तुम्हाला भरावं लागतं. त्यामुळे फोनची एकूण किंमत वाढते. शक्य असल्यास कमीत कमी कालावधीचा प्लॅन निवडा, जरी महिन्याचा हफ्ता थोडा जास्त असला तरी.
५. EMI वर महागडा फोन घेतला, पण त्याचा Insurance कडला नाही. मग विचार करा, जर EMI चालू असताना तुमचा फोन हरवला, चोरीला गेला किंवा तुटला, तर तुम्हाला EMI चे हफ्ते तर भरावेच लागतील! हे दुहेरी नुकसान टाळण्यासाठी, EMI वर फोन घेताना त्याचा योग्य Insurance कडण्याचा विचार नक्की करा.
