Online Food Delivery : ऑनलाइन दूध-ब्रेड मागवताय ? मग तुम्ही पडू शकता आजारी, आज व्हा सावध; हे नक्की वाचा
दूध आणि ब्रेड सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू ऑनलाइन ऑर्डर करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अनेक ई-कॉमर्स कंपन्यांवर कालबाह्य वस्तू विकल्याचा आरोप आहे. या कंपन्या एक्सपायरी डेट काढून वस्तू विकत होत्या असं अन्न विभागाला त्यांच्या तपासणीत आढळून आलं. जर तुमच्यासोबतही असं काही घडलं तर काय करावं, कुठे तक्रार करावी ? हे जाणून घेऊया.

जर तुम्हीही दूध आणि ब्रेड सारख्या दैनंदिन घरगुती वस्तू ऑनलाइन ऑर्डर करत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. असे बरेच लोक आहेत जे डिलिव्हरी घेताना, उत्पादनाची एक्सपायरी डेट देखील तपासत नाहीत आणि उत्पादन मिळाल्यानंतर ते वापरण्यास लगेच सुरुवात करतात, परंतु तुमची ही चूक तुम्हाला खूप आजारी बनवू शकते. देशाची राजधानी दिल्लीतील काही लोकांच्या तक्रारी आल्यानंतर अन्न विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा एक धक्कादायक खुलासा झाला. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपन्या लोकांच्या आरोग्याशी किती खेळत आहेत हे त्यातून समोर आलंय.
जर उत्पादनाची तारीख फक्त एका दिवसाची असेल, तर कंपन्या ती तारीख काढून टाकतात आणि वस्तू विकतात. तपासात हे उघड झाल्यानंतर, अन्न सुरक्षा विभागाने दक्षिण दिल्लीतील एका युनिटला सील केले आहे. हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, अन्न विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की काही काळापूर्वी एका व्यक्तीने तक्रार केली होती की त्याला बुरशीयुक्त ब्रेड डिलीव्हर झाला.
कंपनीचा लायसन्स रद्द
जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा त्यात खरोखरच तथ्य होते. ब्रेडची मुदत संपल्याचे आढळून आले, त्यानंतर एक टीम तयार करण्यात आली आणि ब्रेड विकणाऱ्या कंपनीची चौकशी करण्यात आली, परंतु कंपनीत सर्व काही ठीक होते.त्यानंतर सुरुवातीच्या तपासात हे सर्व एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीत सुरू असल्याचे समोर आले आणि हे उघड झाल्यानंतर कंपनीचा परवाना एका महिन्यासाठी रद्द करण्यात आला.
असाच आणखी एक प्रकार समोर आला ज्यामध्ये डिलिव्हरी कंपनीने गार्लिक ब्रेडची तारीख काढून टाकली होती, या प्रकरणात चौकशी सुरू आहे. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पहिले प्रकरण नाही, दरमहा अशी 4 ते 5 प्रकरणं समोर येत आहेत.
खराब प्रॉडक्ट मिळाल्यास काय कराल ?
जर तुम्हालाही एक्सपायर झालेले उत्पादन मिळाले तर प्रथम ई-कॉमर्स कंपनीशी संपर्क साधा आणि रिफंड मागा. जर समस्येचे निराकरण झाले नाही, तर तुम्ही ग्राहक संरक्षण एजन्सीकडे तक्रार दाखल करू शकता. कालबाह्य झालेली उत्पादने केवळ व्यवसाय आणि ग्राहकांमधील विश्वासाचा भंग करत नाहीत तर ग्राहक संरक्षण कायद्यांचेही उल्लंघन करतात.
अशी करा तक्रार
जर फूड डिलीव्हर करणारी कंपनी तुमची तक्रार ऐकत नसेल, तर तुम्हाला 1800113921 या क्रमांकावर अन्न सुरक्षा विभागाकडे तक्रार करावी लागेल.
