फोन वॉटरप्रूफ बनवायचा आहे का? मग नक्की वापरा ‘हे’ सोपे पण झकास उपाय!
तुमचा फोन वॉटरप्रूफ करायचा आहे का? घरच्या घरी करता येणाऱ्या ‘हे’ सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुम्ही तुमच्या फोनचे संरक्षण करू शकता. जलद, स्वस्त आणि झकास या उपायांमुळे तुमचा फोन पाण्यापासून सुरक्षित राहील, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

smartphoneImage Credit source: Instagram
उन्हाळा कमी होत असून पावसाळा तोंडावर आला आहे. देशभरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय. भारतीय हवामान खात्याने 20 हून अधिक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. यात उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारताचा समावेश आहे. अशा वेळी ऑफिस, कॉलेज किंवा बाहेर जाताना फोनचं पाण्यापासून संरक्षण करणं गरजेचं आहे. फोन आज कॉल, मेसेज, पेमेंट आणि ऑफिसच्या कामांसाठी अत्यावश्यक आहे. त्यात महत्त्वाचा डेटा असतो. पावसात फोन खराब होऊ नये, यासाठी पाच सोप्या टिप्स जाणून घ्या.
- पावसाळ्यात वॉटरप्रूफ फोन केस घेणं महत्त्वाचं आहे. हे केस फोनला पाणी आणि ओलाव्यापासून वाचवण्यासाठी खास बनवलेले असतात. बाजारात अनेक प्रकारचे वॉटरप्रूफ केस उपलब्ध आहेत. तुमच्या फोन मॉडेलला सुट होईल, असं केस निवडा. यामुळे पाण्यामुळे होणारं नुकसान टाळता येईल.
- वॉटरप्रूफ केस वापरणं शक्य नसेल, तर फोन सीलबंद वॉटरप्रूफ पाऊचमध्ये ठेवा. पाऊच पूर्णपणे बंद होतेय आणि पाणी आत जाणार नाही, याची खात्री करा. पाऊचमध्ये सिलिका जेलचं छोटं पॅकेट ठेवा. हे ओलावा शोषून घेईल. पाऊच स्वस्त आणि प्रभावी पर्याय आहे.
- पावसात फोनचं नुकसान टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पावसात फोन वापरू नका. फोन खिशात किंवा बॅगेत ठेवा. कॉल किंवा मेसेज पाठवायचा असेल, तर थांबून कोरड्या जागेची निवड करा. पाण्याच्या संपर्कात फोन येणं टाळा.
- चुकून फोन ओला झाला, तर घाबरू नका. मऊ कापडाने किंवा टिश्यू पेपरने फोन पुसा. पाणी शोषण्यासाठी फोन तांदळाने भरलेल्या भांड्यात 24 तास ठेवा. तांदूळ ओलावा शोषून घेतात. यामुळे फोनचं नुकसान टाळता येईल. फोन बंद करून बॅटरी काढता येत असेल, तर काढा.
- फोन खरेदी करताना त्याची IP रेटिंग तपासा. IP67 किंवा IP68 रेटिंग असलेले फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित असतात. असे फोन पावसात किंवा पाण्याच्या संपर्कात आले, तरी खराब होण्याची शक्यता कमी असते. नवीन फोन घेताना ही रेटिंग नक्की तपासा.
