कीबोर्डच्या अक्षरांचा क्रम QWERTY असाच का असतो? यामागे आहे खूपच रंजक गोष्ट
क्वर्टी कीबोर्ड आजही अत्यधिक वापरात आहे, त्याची लोकप्रियता सवय आणि सुविधा यांमुळे टिकून आहे. या कीबोर्डची रचना तंत्रज्ञान आणि मानवी वर्तन यांचा सुंदर समतोल साधते.

तुम्ही कधी कीबोर्डकडे नीट पाहिलं आहे? मोबाइल, लॅपटॉप किंवा टाइपराइटर, सगळीकडे अक्षरांचा क्रम ABCD असा नसतो. तो आहे क्वर्टी (QWERTY). पण असं का? अक्षरं अशी का मांडली आहेत? यामागची गोष्ट खूप रंजक आहे. बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नसते.
क्वर्टी कीबोर्डची सुरुवात टाइपराइटरच्या काळात झाली. १८६८ मध्ये क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांनी पहिलं यशस्वी टाइपराइटर बनवलं. सुरुवातीला त्यात अक्षरं A ते Z अशीच मांडली होती. पण एक मोठी अडचण आली. लोकांनी जलद टाइपिंग सुरू केलं, तेव्हा टाइपराइटरच्या किल्ल्या एकमेकांना अडकायच्या. मशीन थांबायची. ही समस्या सोडवण्यासाठी शोल्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नवा मार्ग शोधला. त्यांनी अक्षरांची मांडणी अशी केली, ज्याने टाइपिंगचा वेग थोडा कमी होईल, पण किल्ल्या अडकणार नाहीत. यातूनच क्वर्टी कीबोर्डचा जन्म झाला. नाव पडलं वरच्या ओळीतील पहिल्या सहा अक्षरांवरून ती म्हणजे Q, W, E, R, T, Y.
हा कीबोर्ड रेमिंगटन कंपनीच्या टाइपराइटरमुळे प्रसिद्ध झाला. त्या काळात रेमिंगटन ही मोठी कंपनी होती. त्यांनी क्वर्टी लेआउट स्वीकारलं आणि हळूहळू ते सर्वत्र पसरलं. नंतर कॉम्प्युटर आले, तेव्हा लोकांना क्वर्टीची सवय झाली होती. म्हणून हाच क्रम कायम राहिला. पण प्रश्न असा आहे, क्वर्टी हाच एकमेव पर्याय होता का? नाही. १९३० च्या दशकात डॉ. ऑगस्ट ड्वोरक यांनी ड्वोरक कीबोर्ड बनवला. यात अक्षरं अशी मांडली, ज्याने बोटांची हालचाल कमी होईल आणि टाइपिंग जलद, सोपं होईल. पण क्वर्टीची मजबूत पकड आणि लोकांची सवय यामुळे ड्वोरकला फारशी प्रसिद्ध प्रसिद्धी मिळाली नाही.
आजही काही ठिकाणी ड्वोरक किंवा इतर कीबोर्ड लेआउट वापरले जातात, पण क्वर्टीचं वर्चस्व कायम आहे. याचं कारण तंत्रज्ञानापेक्षा मानवी सवय आहे. नवं शिकण्यापेक्षा लोकांना जुनंच सोपं वाटतं. पण विचार करा, जर क्वर्टी नसता, तर आज आपण कदाचित ABCD क्रमाने टाइप करत असतो! काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की आता डिजिटल युगात क्वर्टीची गरज नाही, कारण किल्ल्या अडकण्याची समस्या राहिलेली नाही. तरीही, बदल स्वीकारणं सोपं नसतं.