असा एक तलाव जिथे जो गेला तो परत आलाच नाही… काय घडतं त्या ठिकाणी?
Mysterious Lake of India : देशात रहस्यमयी ठिकाणांची कमी नाही. जगात भारत हा एकमेव विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. देशात अशी अनेक ठिकाणं आहे, ती तिथे विज्ञानाला उत्तर सापडतं नाही, असंच एक ठिकाण म्हणजे हा तलाव...

जगात भारत हा सांस्कृतिकदृष्ट्या सर्वात समृद्ध देश आहे. विविध संस्कृतींनी, भाषांनी, प्रातांनी, परंपरांनी नटलेला देश आहे. देशात अशी काही ठिकाणं आहेत, ती तिथं शास्त्र, विज्ञान आणि मानवी मती थिटी पडते. इथं कोणत्याही कसोट्या लावल्या तरी विज्ञानाचे हात रिकामे राहतात. उत्तर सापडतंच नाही. असाच एक तलाव भारताच्या पूर्वोत्तरच्या अगदी टोकाला आहे. ब्रह्मदेशाच्या(म्यानमार) नियंत्रण रेषे लगत हा तलाव आहे. लेक ऑफ नो रिटर्न (‘ Lake of No Return ’ or the Nawang Yang Lake) असं त्याचं नाव आहे. नावातच सर्व काही आलंय. असं म्हणतात की या तलावात जो गेला तो परतला नाही. माघारी आला नाही.
अनेक किवंदती, खरं तरी काय?
या तलावाविषयी अनेक मिथकं, भ्रम, कथा, दावा असं सर्व काही आहे. या तलावाला नावांग यांग तलाव (Nawang Yang lake) असं पण म्हणतात. हा तलाव अरूणाचल प्रदेशात आहे. असे मानल्या जाते की, द्वितीय विश्व युद्धात अमेरिकन वैमानिकांना हा तलाव जमीन वाटली आणि त्यांनी तिथे विमान उतरवले. ते विमान पायलट आणि इतर सैनिकांसह गायब झाले.
सैनिक झाले गायब
इंडिया टाईम्सनुसार, जेव्हा द्वितीय जागतिक युद्ध संपले. तेव्हा भारताच्या पूर्वोत्तर भागात दाखल झालेले जपानी सैनिक त्यांच्या घराकडे परतायला लागले. पण या तलावाजवळ आल्यावर त्यांना रस्ताच गवसेना. ते पण या तलावात गायब झाले. तर काहींच्या मते, इतके दिवस युद्धाने जरजर झालेल्या या सैनिकांना मलेरिया झाला होता आणि त्यातच ताप डोक्यात गेल्याने ते भ्रमिष्ट झाले. त्यांचा मृत्यू ओढावला.

अजून एक अद्भूत कथा
तर या तलावाजवळील गावातील लोकांची दुसरीच कहाणी आहे. त्याला रहस्याची फोडणी आहे. त्यानुसार, या गावातील एकाने तलावातील मोठा मासा गळाला लावला. त्यानं संपूर्ण गावाला जेवणाचं आवतान पाठवलं. पण एका आजीबाईला आणि तिच्या नातीला काही बोलावणं धाडलं नाही. या तलावाच्या पहारेकऱ्यानं त्या आजीला आणि नातीला गाव सोडण्याचं फर्मान दिलं. दुसऱ्या दिवशी गावच तलावात डुबलं. या कथा काही सांगत असल्या तरी लोक या तलावाला भेट द्यायला काही विसरत नाहीत. अगदी तिथं असलेल्या कोणीही परतले नाही या पाटी समोर खास पोज देत अनेक जणांनी आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. पण या तलावात सहजा सहजी कुणाला आजही जाऊ दिल्या जात नाही.
