हे देवाधिदेवा, तिच्या आईवडिलांना… या मंदिराची दानपेटी लव्ह लेटरने भरली; चिठ्ठ्या वाचून डोकं आपटून घ्याल!
कर्नाटकातील नंदी गावातील भोगानंदेश्वर मंदिरात भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी चक्क देवाला प्रेमपत्रं लिहित आहेत. दानपेटीत सापडलेली ही पत्रं वाचून धक्का बसेल, कारण त्यात प्रेमविवाह, आईवडिलांची संमती, चांगल्या नोकरीसह अनेक वैयक्तिक मागण्या आहेत. ही अनोखी प्रार्थना पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, भाविकांची श्रद्धा आणि इच्छाशक्तीचे एक वेगळेच रूप समोर आले आहे.

जेव्हा आयुष्यात नैराश्य येतं, संकटाचे काळेकुट्ट ढग जमा होतात, हतबलता वाढते आणि कुठलाच मार्ग सापडत नाही, तेव्हा मनुष्याला एकच आधार असतो, तो म्हणजे देवाचा. अशा संकटकाळी मनुष्य मंदिरात जातो आणि देवाची आराधना करतो. प्रायश्चित करतो, माफी मागतो, नवस बोलतो आणि मनोकामना पूर्ण करण्याची आराधनाही करतो. साधारणपणे मंदिरात जाणारे लोक सुख, शांती, समाधान मिळावं म्हणून प्रार्थना करतात. काही लोक अंगावरचं संकट दूर करण्याचं साकडं घालतात. तर काही लोक प्रगती, यश आणि प्रमोशनसाठी देवाला मनधरणी करतात. देवाला जशी फुले वाहिली जातात. तसंच काही लोक देवासमोर लग्नाची पत्रिका ठेवूनच बोहल्यावर चढतात. पण देवाला कुणी लव्ह लेटर अर्पण केलेलं पाहिलंय का? आपल्या शेजारच्या राज्यात म्हणजे कर्नाटकात चक्क देवाला लव्ह लेटर वाहिलं जातंय. कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
कर्नाटकातील चिक्कबल्लपुरा तालुक्यातील नंदी गावात श्री भोगानंदेश्वर मंदिरात काही लोक वेगळंच काही मागायला येतात. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून हे मंदिर चर्चेत आलं आहे. मंदिरातील दानपेटीतील पैसे मोजताना नाणी, नोटांसह चक्क लव्ह लेटर आणि चिठ्ठ्या सापडल्या. हे लव्ह लेटर वाचून सर्वच हैराण झाले. प्रियकरांनी आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी चक्क देवालाच साकडं घातल्याचं या चिठ्ठ्यांमधून स्पष्ट होतंय. त्यामुळे सोसल मीडियावर ही लव्ह लेटर म्हणजे व्हायरल मेटरियल झाले आहेत.
प्रेमाला मंजुरी मिळावी म्हणून काही जणांनी देवाला साकडे घातलेत. प्रेयसीच्या आईवडिलांनी आपलं प्रेम कबूल करावं म्हणून हा चिठ्ठी प्रपंच करण्यात आला आहे. काहींनी तर घरगुती अडचणी दूर करण्यासाठी दुआ केल्या आहेत. देवाची दानपेटी उघडताच त्यात रोमांटिइक, भावूक आणि काळजाला हात घालणारी पत्रे सापडली. हा खजिना म्हणजे एक एक लव्ह स्टोरीचा किस्साच झाला आहे.
पद्मा, तू…
या दानपेट्यांमध्ये काय सापडलं नाही? काही लोकांनी चिठ्ठीत आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. लग्नात येणारे अडथळे मांडले असून ते दूर करण्याचं साकडं देवाला घातलं आहे. काहींनी तर लव्ह लेटरच्या मागे दोघांचीही फोटो लावली आहेत. एकाने तर, पद्मा… पुन्हा ये… असं साकडंच प्रेयसीला घातलं आहे.
देवा, तिच्या आईबापाला…
एका प्रेमीने तर अत्यंत भावूक अंदाजात पत्र लिहिलंय. हे देवा परमेश्वरा… ज्या मुलीवर मी प्रेम करतो, तिच्या आईबापाला सुबुद्धी दे. त्यांनी आमचा खुल्या मनाने स्वीकार करावा. मी तिची कायम काळजी घेईन. कोणत्याही अडथळ्या शिवाय त्यांनी आमचा स्वीकार करावा, असं एकाने पत्रात म्हटलंय. तर काहींनी आपली गरीबी आपल्या प्रेमात अडथळा येत असल्याचं म्हटलं आहे.
बक्कळ पैसा आणि मोठं घर दे
या दानपेटीत फक्त प्रेमपत्रच नाहीये. तर घरातील अडअडचणीही मांडण्यात आल्या आहेत. एका महिलेने तर माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी दे, माझ्या नवऱ्याची बक्कळ कमाई होवो आणि आम्हाला मोठं घर घेता येऊ दे, असं म्हटलंय. या पत्रात या महिलेने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची कामनाही केलीय. माझा मुलगा खूप शिकावा आणि इंजिनिअर बनावा, असं तिने म्हटलंय.
