Shopping Trend: दुकान नाही, मॉलही नाही, मग Gen Z कुठून करतेय शॉपिंग? नवा ट्रेंड आला समोर
Gen Z Shopping Habits: Gen Z ची शॉपिंग स्टाइल बदलत असून, मॉल आणि दुकानांऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मना पसंती दिली जात आहे. सोशल मीडिया आणि AI मुळे खरेदीचे नवे ट्रेंड समोर येत आहेत.

आजच्या डिजिटल युगात शॉपिंगची पद्धत झपाट्याने बदलत आहे. Gen Z साठी सोशल मीडिया हे केवळ रील्स पाहण्याचे किंवा मित्रांशी संपर्क साधण्याचे माध्यम राहिलेले नाही. सोशल मीडिया आणि AI चा वापर नवीन प्रॉडक्ट आणि ब्रँड शोधण्यासाठी केला जात आहे. मात्र, याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असले तरी त्यावर ते आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत. मॅकिन्सेच्या २०२६ मधील ग्राहक सर्वेक्षणावर आधारित अहवालातून Gen Z च्या शॉपिंगच्या सवयी आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील विश्वासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडिया बनले शॉपिंगचा महत्त्वाचा मार्ग
मॅकिन्सेच्या ‘स्टेट ऑफ द कंझ्युमर सर्व्हे’वर आधारित ‘फ्रॉम लाइक्स टू बायज’ या अहवालानुसार, Gen Z साठी नवीन ब्रँड आणि प्रॉडक्ट शोधण्याचे सोशल मीडिया हे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. एखाद्या प्रॉडक्टची माहिती मिळवणे आणि खरेदीपर्यंत पोहोचणे, या दोन्ही टप्प्यांमध्ये तरुण सोशल मीडियाचा वापर करतात. याउलट, बेबी बूमर्स अजूनही प्रत्यक्ष दुकानांवर अधिक अवलंबून आहेत.
सर्वेक्षणातून काय समोर आले?
या अभ्यासासाठी मार्च आणि एप्रिल २०२६ मध्ये 929 Gen Z तरुण आणि 1448 बेबी बूमर्स यांच्या उत्तरांचे विश्लेषण करण्यात आले. रिपोर्टनुसार Gen Z सोशल मीडिया आणि जनरेटिव्ह AI चा मोठ्या प्रमाणावर वापर करते. मात्र, प्रॉडक्टची माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध असलेल्या अनेक माध्यमांवर त्यांचा विश्वास बेबी बूमर्सच्या तुलनेत कमी आहे.
मित्र, कुटुंबीय आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याला महत्त्व
खरेदी करण्यापूर्वी मित्र आणि कुटुंबीयांचा सल्ला, तज्ज्ञांचे मत तसेच सेल्स स्टॉफकडून मिळणारी माहिती या स्रोतांवर दोन्ही पिढ्या विश्वास ठेवतात. मात्र, या स्रोतांवर बेबी बूमर्सचा विश्वास Gen Z पेक्षा अधिक आहे. याशिवाय ऑनलाइन सर्च, ब्रँडच्या अधिकृत वेबसाइट्स आणि ऑनलाइन स्टोअर्स यांनाही मध्यम स्वरूपाचे महत्त्व दिले जाते.
YouTube आणि ऑनलाइन रिव्ह्यूवर अधिक विश्वास
सोशल मीडिया आणि AI च्या तुलनेत यूट्यूब वरील माहिती आणि ऑनलाइन रिव्ह्यू यांच्यावर अधिक विश्वास ठेवला जातो. Gen Z सोशल मीडियावर नवीन प्रॉडक्ट शोधत असली, तरी केवळ एखादी रील, पोस्ट किंवा AI ने दिलेली शिफारस पाहून लगेच खरेदी करण्याचा निर्णय घेत नाही. प्रॉडक्टबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी ते इतर स्रोतांचाही आधार घेतात.
Gen Z चा बदलता शॉपिंग फॉर्म्युला
Gen Z ची शॉपिंग आता केवळ प्रॉडक्ट पाहून लगेच खरेदी करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. सोशल मीडिया नवीन वस्तू आणि ब्रँडची ओळख करून देतो, मात्र अंतिम निर्णय घेताना रिव्ह्यू, ऑनलाइन सर्च, तज्ज्ञांचे मत आणि जवळच्या व्यक्तींच्या सल्ल्याचाही विचार केला जातो. त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढत असला, तरी विश्वास मिळवण्यासाठी प्रॉडक्टची विश्वासार्ह माहिती आणि इतर स्रोतांकडून पडताळणी करणे महत्त्वाचे ठरत आहे.
