
प्रेमात धोका मिळाला तर माणसांच मनच तुटून जातं. त्या वेदनेतून सावरणं, पुन्हा उभं राहण हे खूपच कठीण जातं. पण चीनच्या हुनान प्रांतातील एका महिलेने तिच्या फसव्या पतीचा आणि जिवलग मैत्रीणीचा ज्या प्रकारे बदला घेतला, ते पाहून संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. हे प्रकरण आता सोशल मीडियाच्या ‘जगात’ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. असं काय केलं तिने ?
चीनमधील चांगशा येथील एका महिलेला नुकतंच कळलं की तिच्या पतीचे गेल्या 5 वर्षांपासून कोणाशी तरी विवाहबाह्य प्रेमसंबंध आहेत. पण तिला सर्वात जास्त धक्का बसला, जेव्हा तिला कळली की ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून तिची सर्वात जवळची मैत्रीण आहे. या फसवणुकीमुळे ती महिला प्रचंड दु:खी झाली, कोसळली, पण नशीबाला दोष देण्यापेक्षा आणि अश्रू ढाळत बसण्यापेक्षा तिने असं काही केलं ज्याची कोणी कल्पनाच केली नसेल. बदला घेण्यासाठी महिलेने जो मार्ग अवलंबला तो पाहून सगळेच हैराण झाले.
काय केलं महिलेने ?
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, त्या महिलेने संपूर्ण शहरात लाल रंगाचे बॅनर लावले होते, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिले होते – 5 वर्षे मला साथ देणाऱ्या माझ्या पतीचे आभार. हा तिच्या विश्वासघातकी जिवलग मैत्रिणीवर थेट टोमणा होता, जिने तिच्या पाठीत वार केला होता.
एवढंच नाही तर त्या महिलेने आणखी एक बॅनर लावला ज्यामध्ये तिने थेट तिच्या मैत्रिणीचे नाव घेतले आणि लिहिले, “तिने नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. तिचे तिच्या जिवलग मैत्रिणीच्या पतीशी अवैध संबंध होते?” हा बॅनर समोर येताच
संपूर्ण शहरात खलबळ माजली. कोणीतरी या बॅनरचे फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले , शेअर केले आणि बघता बघता ते फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले आणि लोकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली.
या घटनेने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. काही लोकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केलं, तर अनेकजण तिचं वागणं चुकीचं असल्याचं म्हणत होते. तर महिलेचे हे कृत्य तिच्या मैत्रिणीच्या गोपनीयतेवर आणि प्रतिष्ठेवर हल्ला आहे, ज्यामुळे तिला कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागू शकते असा दावा वकिलांनी केला आहे.
एकवेल पतीने दिलेला धोका मी विसरू शकते पण सर्वात मोठा त्रास तर मला माझ्या मैत्रिणीने दिलेल्या धोक्यामुळे झाला असं त्या महिलेचं म्हणणं आहे. त्याचाच तिने बदला घेतला.