Video : स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, पण प्लास्टिकच्या बॉटलीच सगळीकडे घाण, दृश्य पाहून येईल प्रचंड संताप!
निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच. एका श्रद्धेपोटी सुरू झालेल्या या प्रथेमुळे लाखोंच्या बाटल्यांचा खच तिथे जमला आहे. वाचा सविस्तर

लडाखला फिरायला गेल्यावर तिथले उंच डोंगर, वळणावळणाचे रस्ते आणि निसर्गाचं सौंदर्य पाहून कोणाचही मन हरखून जाईल. पण याच सुंदर परिसरात एक असं ठिकाण आहे. जे बघून सुंदर वाटणार नाही, तर प्रचंड राग येईल. पण ती घाण काही निसर्गत: केलेली नाही, तर माणसानेच पसरवलेली आहे. इथे केवळ आणि केवळ प्लास्टिकच्या बाटल्यांच्या खचाशिवाय तुम्हाला काही दिसणारच नाही.
हे ठिकाण आहे लडाखमधील गाटा लूप्स. इथल्या एका छोट्या मंदिरात पाण्याच्या बाटल्या अर्पण करण्याची प्रथा आहे. मात्र श्रद्धपोटी आणलेल्या बाटल्यांमुळे प्लास्टिक कचरा वाढत असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. मनाली – लेह मार्गावरील गाटा लूप्स हा डोंगरातील वळणावळणाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या 19 व्या वळणावर छोटंसं मंदिर आहे. याला घोस्ट टेम्पल किंवा भूताचं मंदिर म्हणतात.
स्थानिक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथेनुसार, 1999 मध्ये एक ट्रकचा इथे अपघात झाला होता. ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाचा पाणी न मिळाल्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी ट्रकचालक आणि प्रवासी मंदिरात पाण्याच्या बाटल्या अर्पण करू लागले. पुढे ही प्रथा वाढत गेली.
View this post on Instagram
एका व्लॉगरने आपल्या लडाख प्रवासादरम्यान या मंदिराचा व्हिडिओ शेअर केला. मंदिराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच दिसत आहे.तिथे लाखांहून अधिक बाटल्या असू शकतात. असा त्याने अंदाज बांधला.
या मंदिरामागची कहाणी भावनिक असली, तरी श्रद्धा व्यक्त करताना प्लास्टिक कचरा मागे ठेवणं योग्य नाही. पाणी अर्पण करण्याची प्रथा सुरू ठेवायची असेल , तर रिकामी बाटली परत नेणं हा त्यावरचा सोपा मार्ग आहे. कारण ज्या व्यक्तीच्या स्मरणार्थ पाणी अर्पण केलं जातं. त्याला पाण्याची गरज होती, प्लास्टिकच्या बाटल्यांची नाही. हा संदेश व्लॉगरने आपल्या व्हिडिओतून दिला आहे.
