IMD Weather update : पहिल्यांदाच असं घडणार, यंदा राज्यात थंडीचं प्रमाण कसं? हवामान विभागाचा पहिला अंदाज समोर
यंदा देशासह राज्यातील पावसाला एलनिनोचा चांगलाच फटका बसला आहे. जुनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा संपूर्ण महिनाच फक्त पाऊस पडला, त्यानंतर पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे.

यंदा पावसाला एल निनोचा चांगलाच फटका बसला, एल निनोमुळे देशासह राज्यात मान्सूनचं प्रमाण अत्यल्प राहिलं. सुरुवातीला जुनच्या चौथ्या आठवड्यात आणि जुलैचा संपूर्ण महिना राज्यात चांगला पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसामध्ये प्रदीर्घ खंड पडला. या खंडाचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. खरीप हंगाम तर हातचा गेला, परंतु निदान रब्बी हंगामासाठी तरी पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात देखील पाऊस न झाल्याने रब्बी हंगाम देखील संकटात सापडला. यंदा राज्यात पुरेसा पाऊसच न झाल्याने आता पाणी टंचाईची देखील समस्या जाणवायला सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागांमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.
दरम्यान यंदा राज्यात थंडी कशी असेल? गारठा असेल की नाही? याबाबत आता भारतीय हवामान विभाग (IMD) कडून पहिला अंदाज समोर आला आहे. यावर्षी दिवाळीच्या काळात पावसाचा किंवा ढगाळ वातावरणाचा अंदाज नाही. आभाळ स्वच्छ आणि निरभ्र असेल मात्र पश्चिमेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे रात्रीच्या तापमानात कमी येऊन हलकी थंडी जाणवेल, दिवाळीत गुलाबी थंडीच वातावरण राहणार असून, थंडीचा आनंद घेता येणार आहे. दिवसाचं तापमान मात्र सामान्य राहील, असं अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान पश्चिम दिशेकडून येणारे वारे हळूहळू वाढत जाणार आणि थंडीला सुरवात होईल साधारणतः दिवाळीच्या दिवसात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज असतो, मात्र यावेळी आभाळ स्वच्छ राहणार आहे, असं पहिल्यांदाच घडत आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात आता हळुहळु थंडीला सुरुवात होणार आहे.
पाणी टंचाईच्या झळा
दरम्यान यंदा राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. ग्रामीण भागात आतापासूनच टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. शहरी भागात देखील पाणी टंचाई जाणवत आहे. काही दिवसांनी ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते.
