Solapur Accident News: हृदयद्रावक! देवदर्शनाला निघाले, वाटेत अनर्थ घडला; चिमुकल्यासह तिघांचा मृत्यू
कार आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत.

Mohol Accident News: देवदर्शनाला जाताना झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मोहोळ तालुक्यात कार आणि कंटेनरचा भीषण अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात 8 वर्षाच्या चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण जखमी झालेत. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कार- कंटेनरचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार, अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना भक्तांवर घाला घातला असून भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर- पुणे महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील शेटफळ ते तेलंगवाडी गावादरम्यान हा अपघात झाला. यावेळी कार आणि कंटेनरमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झालेत.
पार्थ तुषार भारंबे (वय 8), विलास चांगु भारंबे (वय 66) आणि शोभा विलास भारंबे (वय 63) यांचा मृत्यू झाला. तर तुषार विलास भारंबे आणि पूनम तुषार भारंबे हे पती-पत्नी जखमी झाले आहेत. भारंबे कुटुंबीय अक्कलकोटला देवदर्शनासाठी आज सकाळी कल्याणहून निघाले होते. दुपारी 3 च्या सुमारास मोहोळ तालुक्यात कंटेनरला धडक दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान जखमी रुग्णांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दुसरीकडे, नाशिकमध्ये रस्त्यावरील खोल खड्ड्यामुळे एकाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान सुरक्षितेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पंकज प्रकाश ठाकरे असं मृत मुलाचे नाव असून ओंकार भुसार हा गंभीर जखमी झाला आहे.
