धक्कादायक! लग्नानंतर नवऱ्याच्या ‘त्या’ गोष्टी समजताच पत्नीने थेट गाठलं पोलीस स्टेशन, म्हणाली..
नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर जेव्हा पत्नीला नवऱ्याबद्दलच्या त्या गोष्टी समजल्या तेव्हा तिच्या पायाखालची जमिन सरकली. तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली.

प्रत्येक मुलीच्या आयुष्यामधील सर्वात मोठा आणि क्षण म्हणजे लग्न असतो. ते जर योग्य व्यक्तीसोबत झाले तर पुढील आयुष्य सुंदर असते. अनेक मुली त्यांच्या लग्नाबाबत सुंदर स्वप्ने पाहत असतात. जीवनसाथी प्रामाणिक, सत्य बोलणारा आणि विश्वासाने नातं निभावणारा असावा अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, लग्नानंतर एकामागून एक सत्य समोर येऊ लागतात आणि विश्वास तुटतो आणि तेच नातं वेदना आणि वादाचं कारण ठरतं. असाच एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील नोएडामधून समोर आला असून, एका महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
नोएडामध्ये राहणाऱ्या लविका गुप्ता यांनी पती संयम जैन आणि त्याच्या चार नातेवाईकांविरोधात बिसरख पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एफआयआरनुसार, लविका आणि संयम यांचा विवाह 16 जानेवारी 2024 रोजी झाला होता. महिलेचा आरोप आहे की लग्नापूर्वी महत्त्वाच्या बाबी लपवण्यात आल्या आणि खोटी माहिती देण्यात आली. ज्याच्या आधारे तिने या लग्नासाठी होकार दिला.
शिक्षणाबाबत खोटी माहिती
तक्रारीत लविका गुप्ता यांनी सांगितले की, लग्नाआधी पती बीकॉम पदवीधर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, लग्नानंतर समोर आलं की संयम जैन याने केवळ 12वीपर्यंतच शिक्षण घेतलं आहे. ही माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
महिलेच्या मते, पतीच्या उत्पन्नाबाबतही चुकीची माहिती देण्यात आली. लग्नाआधी संयम जैन यांचं वार्षिक उत्पन्न 18 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु नंतर हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं असं तिने तक्रारीत नमूद केलं आहे.
लग्नानंतर उघड झाली शारीरिक बाब
लविका गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत आणखी एक गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नाआधी पतीचे घनदाट आणि चांगले केस असल्याचं भासवण्यात आलं होतं. मात्र लग्नानंतर लक्षात आलं की संयम जैन टक्कल लपवण्यासाठी विग किंवा हेअर पॅचचा वापर करत होता. ही बाब जाणूनबुजून लपवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यामुळे सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची नोंद पोलिसांनी घेतली असून, सध्या तपास सुरू आहे. महिलेच्या तक्रारीतील आरोपांची सत्यता तपासल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
