Video: पिंपळाच्या झाडातून अचानक वाहू लागले धोधो पाणी, चमत्कार समजून लोकांची झुंबड; काय आहे सत्य?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पिंपळाच्या झाडातून पाणी बाहेर येताना दिसत आहे. आता यामागचे सत्य काय जाणून घ्या...

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील प्रेमलोक परिसरात नुकतीच एक आश्चर्यकारक घटना घडली, ज्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयापासून जवळच्या अंतरावर असलेल्या या भागातील रस्त्या-कडेला असलेल्या एका पिंपळाच्या झाडातून शुक्रवारी रात्री अचानक धोधो पाणी वाहू लागले. या अनपेक्षित प्रकाराने लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली आणि ही बातमी वणव्यासारखी पसरली. आता यामागे नेमकं काय आहे सत्य? जाणून घ्या…
लोकांची प्रतिक्रिया आणि अफवा
या झाडातून पाणी येत असल्याचे पाहून परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर तिथे जमा झाले आहेत. अनेकांनी मोबाईल काढून या ‘चमत्कारा’चे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. काहींनी आपल्या नातेवाइकांना आणि मित्रांना फोन करून ही रंजक कहाणी सांगितली, तर काहींनी या घटनेमागील अर्थ स्वतःच्या पद्धतीने लावण्यास सुरुवात केली. काही वेळातच काही लोकांनी या झाडाला नमस्कार करत पूजा करण्यासही सुरुवात केली. लोकांनी झाडातून येणाऱ्या पाण्याचा विविध प्रकारे वापर केला. काहींनी हात-पाय धुतले, काहींनी डोक्यावर पाणी शिंपडले आणि म्हणाले की यामुळे डोके शांत राहते. काहींनी झाडाभोवती रांगोळ्या काढल्या, तर काहींना वाटले की झाडात देवाने वास केला असावा. यामुळे काहींनी झाडाला हळद-कुंकू लावले, फुलांचे हार चढवले, तर काहींनी पूजाही केली.
Peak of blind faith or sheer stupidity? This IT hub city saw people worshipping a tree with garlands, turmeric, and vermilion—just because water was leaking from it. Later, sensible citizens informed the municipality, only to find out it was a burst pipeline under the tree.… pic.twitter.com/2iQxuBaY7p
— Vijay Kumbhar (@VijayKumbhar62) June 8, 2025
स्थानिकांचा उत्साह आणि चमत्काराची चर्चा
या परिसरात पिंपळाच्या झाडातून पाणी येण्याची घटना यापूर्वी कधीच घडली नव्हती, त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, काही सुजाण नागरिकांनी ही बाब आपल्या जवळच्या लोकांना न सांगता थेट अग्निशमन दलाला कळवली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी झाडाची पाहणी केली. त्यांना आढळले की झाडाच्या खाली पाण्याची पाइपलाइन आहे. त्यांनी ही माहिती पाणीपुरवठा विभागाला कळवली.
सत्य समोर आले
पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपासणी केली. त्यांना दिसले की झाडाच्या मुळांखालून जाणाऱ्या पाइपलाइनला गळती लागली होती. या गळतीमुळे पाणी बाहेर येत होते आणि ते झाडाच्या बुंध्यातून येताना दिसत होते. कारण पाण्यासाठी झाडाचा बुंधा हा एकमेव मार्ग होता. हा सत्य प्रकार समजल्यानंतर लोकांमधील उत्सुकता कमी झाली. ‘चमत्कारा’च्या नावाखाली पसरलेली अफवा खोटी ठरली आणि झाडाभोवती जमलेली गर्दी हळूहळू पांगली.
