अनावश्यक खर्च टाळून बचत करायचीये? मग वापरा या सोप्या टिप्स
रोजच्या खर्चात थोडासा शहाणपणा आणि नियोजन केल्यास बचत करणं अवघड नाही. हळूहळू ही एक चांगली सवय बनते आणि आर्थिक शिस्त निर्माण होते. संकटाच्या काळात हीच बचत उपयोगी पडते. त्यामुळे आजपासूनच तुम्ही हे छोटे बदल स्वीकारा आणि भविष्यासाठी एक मजबूत आर्थिक फंड तयार करा

सध्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसला आहे. किराणा सामान, पेट्रोल-डिझेल, वीज, गॅस आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांच्याही किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत अनेकांना महिन्याचा खर्च भागवतानाच बचतीसाठी वाट शोधावी लागते. पण, जर तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये थोडेसे सकारात्मक बदल केले, तर तुम्ही सहजपणे दर महिन्याला काही रक्कम वाचवू शकता. हे छोटे-छोटे उपाय फार खर्चिक किंवा कठीण नसतात, पण त्यांचा परिणाम दीर्घकालीन असतो.
1. विजेच्या बिलावर नियंत्रण ठेवणे ही बचतीची एक महत्त्वाची पायरी आहे. दिवे, फॅन, टीव्ही किंवा चार्जर गरज नसताना चालू ठेवलेली उपकरणे वीजेचा अपव्यय करतात. LED बल्ब, ऊर्जा कार्यक्षम उपकरणे आणि BLDC तंत्रज्ञानाचे फॅन वापरल्यास महिन्याच्या शेवटी बिलात मोठा फरक पडतो. वीज वाचवणे म्हणजेच थेट पैशांची बचत!
2. ग्रोसरी शॉपिंगला जाताना यादी तयार करून ठरवलेल्या गोष्टीच खरेदी केल्यास अनावश्यक वस्तूंवर होणारा खर्च टाळता येतो. तसंच, महिन्याच्या सुरुवातीलाच घरखर्चासाठी बजेट तयार करा. जेव्हा तुम्ही ठराविक मर्यादेतच खर्च करता, तेव्हा तुमच्याकडे बचतीसाठी अधिक रक्कम शिल्लक राहते.
3. बाहेरून अन्न मागवण्याऐवजी घरी जेवण तयार करा. हे केवळ आरोग्यदायी नसून किफायतशीरही ठरते. उरलेले अन्न साठवून दुसऱ्या दिवशी वापरल्यास अन्नाची नासाडीही टळते आणि पैसेसुद्धा वाचतात. तसेच, घरी चहा, नाश्ता बनवणं हेही एका महिन्यात लक्षणीय बचत करू शकतं.
4. दैनंदिन प्रवासात सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा पायी चालण्याचा पर्याय निवडल्यास इंधन आणि वाहनांच्या देखभाल खर्चात बचत होते. शक्य असेल तेव्हा कारपूलिंगचा विचार करा. शिवाय, वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करून इंधन कार्यक्षमतेत सुधारणा करा.
5. ई-कॉमर्स वेबसाइटवर भरपूर सवलती आणि कूपन उपलब्ध असतात. पण केवळ ऑफरमुळे नको असलेल्या वस्तू खरेदी करणे टाळा. गरजेनुसारच वस्तू खरेदी करा आणि शक्यतो विविध साइट्सवर किंमत तुलना करूनच अंतिम निर्णय घ्या. कधी-कधी “No Spend Day” पाळणं देखील फायदेशीर ठरतं.
6. महिन्याच्या सुरुवातीलाच उत्पन्नातील थोडी रक्कम वेगळी काढा आणि ती गुंतवणुकीसाठी वापरा. नियमित रक्कम SIP, आवर्ती ठेव (RD) किंवा बँक बचत खात्यात जमा केल्यास, तुमची बचत सवयीने वाढू शकते. ऑटो-डिडक्शन सुविधा वापरल्यास हे अधिक सुलभ होते.
7. घरगुती पातळीवर पाण्याचा अपव्यय टाळल्यास पाण्याचे बिलही कमी होते आणि पर्यावरणही वाचते. गळके नळ, सतत चालू असलेले फिल्टर्स किंवा नळ खाली चालू असलेल्या वॉशिंग मशीनमुळे अतिरिक्त पाणी वाया जाते. त्यावर वेळीच उपाय करा.