गणेशोत्सवाआधी भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीट बूकिंगबाबत मोठा निर्णय, 1 ऑगस्टपासून अंमलबजावणी
श्रावण महिना सुरु असला तरी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाची लगबग आतापासूनच सुरु झाली आहे. बाजारात गणेशोत्सवाची खरेदी सुरु झाली आहे. तसेच कोकणवासियांना गावाचे वेध लागले आहेत. असं असताना रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. खासकरून कोकणात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्यामुळे मुंबई पुण्यात नोकरीनिमित्त राहणाऱ्यांना गावाचे वेध लागतात. कोकणवासिय गणपतीसाठी वार्षिक सुट्टीचं आधीपासूनच नियोजन करून ठेवतात. या सणानिमित्त कोकणातील वाड्या वस्त्या फुलून जातात. पण घरी जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रेल्वेचं आरक्षण पूर्ण झाल्याने गावी कसंबसं खस्ता खात जावं लागतं. त्यातल्या त्यात रेल्वेने गावी जाण्याचा प्रवास हा सुखकर मानला जातो. त्यामुळे रेल्वेने जाण्यास पसंती दिली जाते. असं असताना रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा बदल केला आहे. तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. या बदलामुळे तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि सुरक्षित होणार आहे. हा नवा नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे.
1 ऑगस्ट 2025 पासून आयआरसीटीसी वेबसाईट किंवा मोबाईल एपच्या माध्यमातून तात्काळ तिकीट नोंदणी करण्यासाठी आधारकार्ड आधारित ओटीपी व्हेरिफिकेशन अनिवार्य केलं आहे. यामुळे बनावट खात्याद्वारे किंवा चुकीच्या ओळखीद्वारे तिकीट बुकिंगची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल. याचा खऱ्या प्रवाशांना अधिक फायदा होईल. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, बनावट ओळखपत्रे वापरून तिकिटे बुक करणे, काळाबाजार करणे किंवा एजंटांकडून गैरवापर केल्याच्या वारंवार तक्रारी येत असल्याने हा बदल करण्यात आला आहे.आधार पडताळणीमुळे प्रत्येक बुकिंग रिअल टाइममध्ये ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे कोणतीही गडबड लगेच कळून येईल. कोणता युजर्स कोणत्या नावाने, कोणत्या डिव्हाइसवरून आणि कोणत्या ठिकाणाहून तिकिटे बुक करत आहे हे देखील रेल्वेला कळेल.
आपत्कालीन कोट्याच्या तिकिटांसाठी अर्ज आता प्रवासाच्या किमान एक दिवस आधी करावे लागणार आहे. या बदलामुळे ट्रेन चार्ट वेळेवर तयार होण्यास मदत होईल आणि कामकाजात सुलभता येईल. रेल्वे बोर्डाने स्पष्ट केलं की, ट्रेन आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधी तयार केले जातील. या बदलांमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे चांगले नियोजन करण्यास मदत होईल.
