मविआच्या अंतर्गत सर्व्हेत ठाकरे तिसऱ्या नंबरवर? तर महायुतीत भाजपसह कोणाला किती जागा?

| Updated on: Aug 29, 2024 | 10:49 AM

दोन ते अडीच महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी, महाविकास आघाडीनं अंतर्गत सर्व्हे केलाय. त्यानुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत असून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?

येत्या 2 अडीच महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्यात मविआचंच सरकार येईल, असा मविआचा सर्व्हे समोर आला आहे. तर काँग्रेसचे सर्वाधिक आमदार राहतील आणि ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहील, असे समोर आलेल्या सर्व्हेचे आकडे सांगतायत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 जागा मिळू शकतात. तर ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून 32-35 जागाच मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आलीय. दुसरीकडे, महायुतीचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या सर्व्हेत भाजपला 55 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा 33 आमदार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 18 आमदार निवडून येतील असं भाकीत वर्तवण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या सर्व्हेची आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्तेत येताना दिसतेय. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं मिशन 125 ठेवल्याची माहिती आहे. 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं भाजपला वाटतंय तर 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असा भाजपचं अॅनेलिसिस आहे.

Published on: Aug 29, 2024 10:49 AM
Follow Us