Mumbai Local Train Update : मुलुंड ते ठाणे, कांजूर ते भांडूप… मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा बिघडली; चाकरमान्यांचे हाल
मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुलुंड ते ठाणे आणि कांजूर ते भांडूप दरम्यान सिग्नल बिघाडामुळे सकाळी १० वाजल्यापासून अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा मंदावली आहे. यामुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी उशीर होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुलुंड ते ठाणे आणि कांजूर ते भांडूप या दोन प्रमुख ठिकाणी सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने अप आणि डाउन जलद तसेच धीम्या मार्गावरील लोकल सेवा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे. सकाळी १० वाजल्यापासून ही वाहतूक मंदावली असून, रेल्वेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या उशिराने धावत आहेत, तर काही ठिकाणी त्या जागच्या जागी थांबल्या आहेत. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना आणि व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवासी ट्रॅकवरून चालत जाताना दिसत आहेत, ज्यामुळे त्यांची गैरसोय वाढली आहे. मध्य रेल्वेने पर्यायी व्यवस्था किंवा वेळेत घोषणा न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून काही अवधी लागेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
